मुंबईकरांना घराजवळच मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मुंबईकरांसाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी गेल्या दोन वर्षांत तब्बल 76 लाखांवर सर्वसामान्य आणि गोरगरीबांनी मोफत उपचार घेतले आहेत. मुंबईकरांचा प्रतिसाद व गरज लक्षात घेता आणखी 37 ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत 243 ‘आपला दवाखाना’ रुग्णसेवेत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईच्या झोपडपट्टी भागातील गोरगरीबांना घरापासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी पालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उपक्रम सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी पालिकेकडून खासगी आणि नामांकित प्रयोगशाळांशी करार करून विविध प्रकारच्या 147 चाचण्या मोफत केल्या जात आहेत. ही आरोग्य केंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे कामावरून उशिरा घरी येणाऱ्या सर्वसामान्यांनाही मोठा फायदा होत आहे. मुंबईत 17 नोव्हेंबर 2022 रोजी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरातील 243 ठिकाणी ही सुविधा सुरू आहे. या ठिकाणी रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्री रोगतज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोगतज्ञ अशा विविध तज्ञांकडून उपचार, महानगरपालिका दरात एक्स रे, सोनोग्राफी, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी सुविधा आदी सुविधेचा लाभ घेतला असून, विविध चाचण्याही करून घेतल्या आहेत. मुंबईकरांना आपल्या परिसरातच, घराजवळ वैद्यकीय सुविधा मिळण्याच्या उद्दिष्टाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ची संख्या अधिकाधिक वाढवून, नियोजित वेळेत करून वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.
मुंबईकरांना दोन सत्रांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतानाच गुणवत्तापूर्ण सेवा तसेच पुरेशी औषधे नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.
अशी आहे सुविधा…
सध्या कार्यरत असलेल्या आपला दवाखान्यांपैकी, पोर्टाकेबिन्समध्ये 85, सुसज्ज इमारतीत 17, नियमित दवाखाने 108 आणि पॉलिक्लिनिक्स 33 याप्रमाणे दवाखाने कार्यरत आहेत. आरोग्य सुविधांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने झोपडीबहुल भागातील प्रत्येक 25 हजार लोकसंख्येसाठी एक दवाखाना तर अडीच लाख लोकसंख्येसाठी एक पॉलिक्लिनिक अशा पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात येते, असेही पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. दोन सत्रांमध्ये दवाखान्याची सेवा रुग्णांसाठी उपलब्ध असून या दवाखान्यांच्या ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी 1 हजार 140 कर्मचारी कार्यरत आहेत.