महाराष्ट्रातून भाजपचा सुपडा साफ होणारच! सत्यपाल मलिक यांनी घेतली, उद्धव ठाकरे यांची भेट

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला केवळ फटका बसणार नसून भाजपचा सुपडा साफ होईल, असा ठाम विश्वास माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपच्या गलिच्छ राजकारणावर सडकून टीका केली.

मुंबई दौऱ्यावर आलेले जम्मू-कश्मीर, गोवा आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उपस्थित होते. महाराष्ट्रात हरियाणासोबतच विधानसभा निवडणूक होणार होती, मात्र पराभवाच्या भीतीमुळे या निवडणुका एकत्र घेतल्या नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला. मात्र आताही महाराष्ट्रात भाजपचा पराभव शंभर टक्के होणार असल्याचे ते म्हणाले. पुलवामा प्रकरणात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळेच आपल्या 40 जवानांचा नाहक बळी गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

महाविकास आघाडीचा प्रचार करणार

मलिक यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीच्या प्रचारात, कॅम्पेनमध्ये सहभागी होणार आहोत. या निवडणुकीत भाजपचा पराभव नक्की असल्यामुळे महाविकास आघाडीच्या विजय रॅलीतही सहभागी होणार. महाराष्ट्रात भाजपचा पराभव होईल आणि महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल, असे मलिक म्हणाले.

‘मातोश्री’वर आदरातिथ्य

मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी सत्यपाल मलिक यांचे आदरातिथ्य केले. याबाबत मलिक यांनी एक्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे यांच्या भेटीने मला अपार आनंद झाला. त्यांनी जो मान सन्मान मला दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे मलिक यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरेंची भूमिका महत्त्वाची राहणार

महायुती सरकारवर टीका करताना इंग्रजीतील ‘लास्ट नेल इन बीजेपी कॉफिन’ या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख करून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे भाजपच्या अंताची सुरुवात असेल, असे सत्यपाल मलिक म्हणाले. भाजपचा सफाया करण्यात उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील. महाराष्ट्रातूनच नाही, तर देशभरातून भाजपचा सफाया निश्चित आहे, असे मलिक म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुखांना वंदन

सत्यपाल मलिक यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करीत पुष्पहार अर्पण केला. तसेच शिवतीर्थावरील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुखांना वंदन करीत नतमस्तक झाले.