ठाण्याच्या शौर्याची सुवर्ण धाव, राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी

पुण्याच्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने मैदान गाजवले. मुलींच्या 16 वर्षांखालील  60 मी. धावणे शर्यतीत शौर्याने 7.58 सेकंदांचा नवीन विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. शिवाय 80 मी. अडथळा शर्यतीतसुद्धा शौर्याने 11.47 सेकंदांचा नवा राज्य विक्रम नोंदवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

बालेवाडीत महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा 19 ते 22 सप्टेंबरदरम्यान पार पडली. या स्पर्धेत दमदार कामगिरी करत ठाण्याच्या शौर्याने सर्वांचीच वाहवा मिळवली. 16 वर्षांखालील मुलींच्या 60 मी. धावणे स्पर्धेत शौर्याने यापूर्वीचा 7.77 सेपंदांचा विक्रम मोडीत काढत 7.58 सेपंदांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. तसेच 80 मी. अडथळा शर्यतीतसुद्धा शौर्याने यापूर्वीचा 11.76 सेकंदांचा राज्य विक्रम मोडीत काढून 11.47 सेकंदांचा नवा राज्य विक्रम नोंदविण्याची किमया केली. या दोन्ही धावणी स्पर्धेत शौर्याने अन्य स्पर्धकांना लिलया मागे टाकत सुवर्ण पथकांना गवसणी घातली. ठाण्याच्या  युनिव्हर्सल हायस्पूलची विद्यार्थिनी असलेली शौर्या ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांच्या त्यांच्या एम स्पोर्टस् अकादमीत गेल्या आठ वर्षांपासून खडतर प्रशिक्षण घेत आहे. शौर्याचे या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.