पंडित नेहरुंची कागदपत्रे अभ्यासासाठी द्या
ऐतिहासिक संदर्भ असलेली पंडित नेहरू यांची व्यक्तीगत कागदपत्रे, नोंदी प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वरूपात अभ्यासासाठी मिळाव्यात अशी मागणी पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीचे सदस्य रिझवान कादरी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. सध्या ही कागदपत्रे सोनिया यांच्या ताब्यात आहेत. कादरी हे अहमदाबादमधील स्थानिक महाविद्यालयात इतिहास शिकवतात. नेहरूंच्या खासगी कागदपत्रांचा समावेश असलेले 51 बॉक्स सोनिया यांनी परत नेले होते. कादरी यांनी सोनिया यांना एक पत्र लिहून ही कागदपत्रे परत द्यावीत अशी मागणी केली आहे.
अयोध्या-सीतामढी वंदे भारत ट्रेनची मागणी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अयोध्या आणि सीतामढी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची विनंती केली आहे. देवी सीतेचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या सीतामढी जिह्यातील पुनौरा धाम जानकी मंदिर या हिंदू तीर्थक्षेत्राचा राज्य सरकार विकास करत आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाला योग्य सूचना देण्यात याव्यात, असे नितीश कुमार यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. सीतामढी जिह्यातील पुनौरा धामला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. या मंदिराच्या सर्वांगीण विकास प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच 72.47 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
स्कॉच, वाईनचा हिंदुस्थानात खप वाढला
हिंदुस्थानातील गर्भश्रीमंत वर्ग उच्च प्रतीच्या मद्यांचा चाहता असल्यामुळे दर्जेदार स्कॉच आणि उत्तम वाईनची विक्री वाढली असून अमेरिका आणि चीनलाही हिंदुस्थानातील खपाच्या आकड्यांनी मागे टाकले आहे. स्कॉचच्या विक्रीत तर हिंदुस्थानने आधीच चीनला मागे सारले असून, अमेरिकेपेक्षाही दुपटीने ही विक्री वाढते आहे. 2002 पर्यंत हिंदुस्थानात होणारी स्कॉच आयात अमेरिका, चीन आणि इतर महत्त्वाच्या बाजारपेठांना मागे टाकून 66 टक्के अशा चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढली आहे. 2023 मध्ये तर हिंदुस्थानकडे स्कॉचच्या 167 दशलक्ष बाटल्या निर्यात झाल्या. 2019 च्या तुलनेत ही निर्यात 27 टक्के अधिक होती.
वेस्ट बँकमधील अल जझीरा कार्यालय इस्रायलने केले बंद
वृत्तवाहिनीचे कार्यालय इस्रायली सैन्याने रविवारी बंद करण्यास भाग पाडले. गाझा पट्टीतील इस्रायल हमास संघर्षाचे वार्तांकन कतारमधील या चॅनेलकडून नियमितपणे सुरू असते. रामल्लाह येथील हे ब्युरो ऑफिस 45 दिवस बंद ठेवावे असे आदेश इस्रायली सैनिक देत असल्याचे चित्रिकरण चॅनेलने आपल्या अरबी भाषेतील चॅनेलवर प्रसारित केले आहे. इस्रायलने देशात कार्यरत असलेले परदेशी वृत्तसेवा कार्यालय बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तथापि, अल जझीराने वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमधून वार्तांकन सध्या सुरूच ठेवले आहे. ब्युरो बंद केल्यावर शेजारच्या जॉर्डनमधील अम्मानमधून अल जझीराने थेट प्रक्षेपण सेवा सुरू ठेवली आहे.
हिंदुस्थानातून चोरलेल्या पुरातन मूर्ती परत मायदेशात
अमेरिकेत चोरून नेण्यात आलेल्या 297 पुरातन मूर्ती, कलाकृती आदी वस्तू पुन्हा हिंदुस्थानच्या हवाली करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानची परंपरा आणि ऐतिहासिक वारशाचा भाग असलेल्या या वस्तूंमध्ये 10-11 व्या शतकातील मध्य भारतातील वाळूच्या दगडातील ‘अप्सरा’, 15-16 व्या शतकातील कांस्य धातूत घडवलेली जैन तीर्थंकर मूर्ती, 3-4 व्या शतकातील पूर्व भारतातील टेराकोटा फुलदाणी यांचा समावेश आहे. इतर प्रमुख वस्तूंमध्ये 17-18 व्या शतकातील दक्षिण भारतातील कांस्यातील भगवान गणेश, 15-16 व्या शतकातील उत्तर भारतातील वाळूच्या दगडात भगवान बुद्ध आणि 17-18 व्या शतकातील पूर्व भारतातील कांस्यातील भगवान विष्णू यांचा समावेश आहे.
बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर
बिहारमधील 12 जिह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, 12.67 लाख लोक बाधित झाले आहेत. या जिह्यांत सुमारे 1400 बोटी जिल्हा प्रशासनाकडून बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात आहेत. आठ ठिकाणी मदत छावण्या सुरू आहेत. धोकादायक भागांतील लोकांना हलवून या छावण्यांमध्ये आणण्यात आले आहे. बक्सर, भोजपूर, सारण, वैशाली, पाटणा, समस्तीपूर, बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, खगरिया, भागलपूर आणि कटिहार या जिह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. रविवारी भागलपूर जिह्यातील एका पुलाच्या गर्डरला पुराच्या पाण्याचा स्पर्श झाल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आणि अनेक गाड्या वळवण्यात आल्या. जमालपूर-भागलपूर विभागातील काही ठिकाणी अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.
इराणमधील कोळसा खाणीतील स्फोटात 34 ठार
इराणमधील एका कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 34 कामगार ठार आणि 17 जखमी झाले. शनिवारी रात्री राजधानी तेहरानपासून सुमारे 540 किमी अंतरावर असलेल्या तबास येथील कोळशाच्या खाणीत हा स्फोट झाला. रविवारपर्यंत खाणीतून मृतदेह बाहेर आणण्यात येत होते. स्फोटाच्या वेळी जवळपास 70 कामगार खाणीत काम करत होते. स्फोटामुळे 17 जण 700 मीटर बोगद्याच्या खाली खोलवर अडकले होते. मिथेन वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्योतिर्मठ शंकराचार्यांनी राम मंदिरात पूजा टाळली
उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ येथील शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद सरस्वती यांनी रविवारी येथील राम मंदिरात पूजापाठ, वंदन करण्याचे टाळले. अर्धवट बांधलेल्या मंदिरात प्रार्थना करता येत नाही. जेव्हा मंदिराचे शिखर पूर्णत्वास जाईल तेव्हाच आपण राम मंदिरात पूजा करू, असे ते म्हणाले. त्यांनी चिनेश्वरनाथ मंदिरात विशेष प्रार्थना सेवा केली आणि अयोध्येतील रामकोट परिसरासह रामजन्मभूमी परिसराची प्रदक्षिणा केली.
चाइल्ड पॉर्नविषयी आज सर्वोच्च न्यायालयात निकाल
चाइल्ड पॉर्न डाऊनलोड करून पाहाणे हा पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नाही या मद्रास हायकोर्टाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्देश देण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे बी पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. 11 जानेवारी रोजी, मद्रास हायकोर्टाने 28 वर्षीय व्यक्तीवरील कारवाई वरील निकाल देत रद्द केली होती.