अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत जीवतोड अभ्यास करून आयएएस झालेल्या उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिमांशू याचे बालपण अतिशय गरिबीत गेले. वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या दुकानात चहा विकला तसेच मजुरीचे कामही केले. आज त्यांनी आयएएस होऊन मोठा इतिहास रचल्याने त्याच्या आईवडिलांच्या, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
एखादी गोष्ट करण्याची जिद्द मनात असेल तर तुम्ही कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. नेमके हेच हिमांशू गुप्ता याने सिद्ध केले. त्याने शाळेत जाण्यासाठी रोज तब्बल 70 किमीचा प्रवास केला. त्याने अत्यंत चिकाटीने आणि मेहनतीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी बनला.
अतिशय प्रेरणादायी अशी गोष्ट
ह्युम्स ऑफ बॉम्बे या फेसबुक पेजवर हिमांशु गुप्ता याने आपली अतिशय प्रेरणादायी अशी गोष्ट सांगितली. तो म्हणाला, मी शाळेत जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर माझ्या वडिलांसोबत काम करायचो. एकदा कुणीतरी मला पाहिले आणि मस्करी करायला सुरुवात केली. मला चायवाला म्हटले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना मदत केली आणि अखंड मेहनत करत स्वप्न साकार केले असे तो म्हणाला.