आता चर्चा नको, अंमलबजावणी हवी; मनोज जरांगे पाटील यांची ठोस भूमिका

उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक घेऊन मागण्या मान्य कराव्यात. मराठे आता चर्चा नको अंमलबजावणी हवी अशी ठोस भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. ओबीसी आंदोलन केवळ भांडण उकरून काढण्यासाठी असल्याचा आरोप करून, आज आमचा रस्ता बंद करणार्‍या सरकारचा रस्ता आम्ही उद्या बंद करू असा इशाराही त्यांनी दिला. आंतारवालीतील उपोषणाच्या सहाव्या दिवशी ते पत्रकारांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले की, आता संपर्क नको. आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. आम्ही अन्याय सहन करण्याच्या बाहेर आहोत. मुंबई आंदोलनाविषयी मला माहीत नाही. मुंबईला वर्षावर बैठकीची मला कल्पना नाही. कोण तज्ज्ञ या बैठकीत आहेत, बैठक पाकीस्तानमध्ये होणार की कुठे हे मला माहीत नाही. मराठ्यांवर सरकारकडून ठरवून अन्याय सुरू आहे, अन्याय किती करावा याची मर्यादा पाहिजे. ओबीसी -मराठा एकमेकांच्या अंगावर जात नसून एक-दोन नाटक कंपन्या आहेत. आम्हाला राजकारणात जायचे नाही म्हणून उपोषण सुरू आहे. फडणवीसांना ही मोठी संधी आहे. दोषी ते आहेत. नंतर त्यांना थोबाड उचकटता येणार नाही. एक किंवा दोन दिवसांत निर्णयाबाबाबत आम्ही आशावादी असल्याचे ते म्हणाले.

बौद्धांसारखेच मराठ्यांचे शोषण

आंतरवाली सराटीकडे येणार्‍या आमचा रस्ता बंद करून गावातून जाऊ नका असे सांगत आहेत. पूर्वी बौद्धांचे जसे शोषण झाले तसे आता मराठ्यांचे होत आहे. बौद्धांना जसे वाळीत टाकले जात होते, तसेच आमचे होत आहे. दवाखाना, शाळा आणि कॉलेजात जायचे रस्ते बंद केले आहेत. उद्या कोणी मेले, काही झाले तर दवाखान्यात जायचे कसे? आम्ही हे केले असते तर मराठ्यांनी अन्याय केला म्हणून बोंब मारली असती. फडणवीस आणि भुजबळ सरकार चालवतात का? आमचा रस्ता बंद करून त्या रस्त्याने गेलो तर मारत आहेत. आज आमचा रस्ता बंद आहे, उद्या आम्ही तुमचा रस्ता बंद करू असा इशाराही त्यांनी दिला.

ही भुजबळांची नाटक कंपनी

आंतरवाली सराटी, वडीगोद्री येथे सुरु असलेल्या ओबीसींच्या आंदोलनावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. त्यांचा लढा ओबीसींसाठी नाही तर भांडण उकरून काढण्यासाठी आहे. ही भुजबळांची नाटक कंपनी असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. ओबीसींचा खरा लढा पंढरपूर येथे सुरू आहे. येथील आंदोलनामुळे मराठ्यांवर अन्याय होतो. त्यांना वाळीत टाकण्याची, एकटे पाडण्याची तयारी करण्यात येत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. हेच जर मराठ्यांनी केले असते तर त्यांचा किती थयथयाट झाला असता. पायात घुंगरं घालून नाचले असते, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.

हे आंदोलन फडणवीसांमुळेच….

हे आंदोलन फडणवीस यांच्यासाठीच असल्याचा टोला जरांगे पाटील यांनी हाणला. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर त्याचा दोष त्यांचाच असेल. येत्या तीन चार दिवसात यावर तोडगा निघेल, असा विश्वासपण जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

सुरुवात तुम्ही केली शेवट मराठा करेल

आमच्या मुलाला मारहाण केली. सुरुवात त्यांनी केली शेवट मराठा करेल. फडणवीसांनी मराठ्यांचा रस्ता बंद केला, हा अन्याय नाही का? गोंदीचा अधिकारी जातीयवादी, कालपासून मराठ्यांना तू त्रास द्यायला लागला आहे. तुझ्यातील जात जागी झाली का? काही लोकांनी तुझ्या अंगावर डिझेल टाकले होते. आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करतो का. तुझी जात जागी झाली का, आमचा रस्ता यांनी बंद केला. जर आम्ही केला असता तर हाच देवेंद्र फडणवीस म्हटला असता वाळीत टाकला म्हणून. आरक्षण मिळेपर्यंत शांत रहा, सगळ्यांचा हिशोब होणार आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.