75 वर्षांत निवृत्त होण्याचा नियम मोदींना लागू नाही का? केजरीवाल यांचा मोहन भागवत यांना सवाल

देशात सध्या सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून दुसरे राजकीय पक्ष फोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच 75 वर्षांत निवृत्त होण्याचा नियम मोदींना लागू नाही का? असा सवालही पुढे केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला आहे. दिल्लीतील जंतरमंतर मैदानात आयोजित जाहीर सभेत केजरीवाल बोलत होते.

तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडली जात आहेत. मोदींचे हे कारस्थान हिंदुस्थानच्या लोकशाहीसाठी योग्य आहे का? हे लोकशाहीसाठी घातक नाही का? असा सवाल आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला आणि मोदी सरकारच्या दडपशाहीच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे.

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कलराज मिश्रा यांच्यासारखे नेते 75 वर्षात निवृत्त झाले. निवृत्तीचा हा नियम मोदींना का लागू होत नाही? असा खडा सवालही त्यांनी मोहन भागवत यांना यावेळी विचारला.

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा केल्यानंतर जंतरमंतर मैदानावर पहिलीच जाहीर सभा घेतली. या सभेत केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच येत्या निवडणुकीत आपला मतदान करण्याचे आवाहनही केजरीवाल यांनी केले.

भाजपने मला भ्रष्ट आणि चोर म्हटले याचे वाईट वाटले. मला सत्ता आणि खुर्चीचा लोभ नाही. दिल्लीची निवडणूक ही माझी लिटमस टेस्ट आहे. मी प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा, असे आवाहन केजरीवाल यांनी जाहीर सभेतून केले आहे.

निवडणुका प्रामाणिकपणे लढवता येतात आणि जिंकताही येतात. 4 एप्रिल 2011 रोजी जंतरमंतर येथून भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू झाले. निवडणूक जिंकण्याचे आव्हान होते. इतर पक्षांना निवडणुकीसाठी पैशांची, गुंडांची गरज लागते. आमच्याकडे काही नव्हते. मात्र आम्ही निवडणूक लढवली आणि जनतेने आम्हाला विजयी केले. पहिल्यांदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले. निवडणूक प्रामाणिकपणे लढवता येते आणि जिंकताही येते हे आम्ही सिद्ध केले, असे केजरीवाल पुढे म्हणाले.