सैन्याची विशेष ट्रेन बॉम्बने उडविण्याचा डाव फसला, मध्य प्रदेशात रेल्वे रूळावर सापडले 10 डेटोनेटर

मध्यप्रदेशात सैन्याच्या विशेष ट्रेनला बॉम्बने उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ट्रेनला बॉम्बने उडविण्यासाठी ट्रॅकवर 10 डेटोनेटर लावून कट रचण्यात आला होता. या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशातील बुरहानपुर जिल्ह्यामध्ये एका मोठ्या कटाचा प्रयत्न फसला आहे. इथे सैन्यांना घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रेनला उडविण्याचा कट रचला गेला होता. त्यासाठी नेपानगरमधील रेल्वे ट्रॅकवर 10 डेटोनेटर लावण्यात आले होते. ट्रेन पोहोचण्याच्या आधीच त्यात काही डेटोनेटरचे स्फोट झाले.

रेल्वेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 18 सप्टेंबरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्यांच्या जवानांची विशेष ट्रेन जम्मू काश्मीरहून कन्याकुमारीला जात होती. ट्रेन पोहोचण्याआधी ट्रॅकवर ठेवण्यात आलेले डेटोनेटरचा स्फोट झाला. त्यानंतर अधिकारी अलर्ट मोडवर आले आणि त्या ट्रेनला सागफाटा स्टेशनवर रोखण्यात आले . त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली आहे.

या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी एनआयए आणि एटीएस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि संशयितांची चौकशी करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काही संशयितांना ताब्यातही घेतले आहे. आतापर्यंत या कटामागे नेमका कोणाचा हात होता आणि त्यांचा उद्देश काय होता याबाबत काही स्पष्ट झालेले नाही. सुरक्षा एजन्सींनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतले असून सर्व पैलूंनी त्याचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर देशभरातील सुरक्षा एजेन्सी हाय अलर्टवर आहेत. रेल्वे ट्रॅक आणि अन्य महत्वपूर्ण पायाभूत सुविधांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.