पंजाबमध्ये आईस फॅक्टरीत गॅस गळती, एकाचा गुदमरून मृत्यू; सहा जणांची सुखरुप सुटका

पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात एका आईस फॅक्टरीत अमोनिया गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे आईस फॅक्टरीतील एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. अन्य सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

गॅस गळती झाल्यानंतर फॅक्टरीतील कामगारांना श्वासोश्वासाचा त्रास, डोळ्यांची जळजळ होऊ लागली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ सर्व कामगारांना बाहेर काढले.

मात्र गॅस गळतीमुळे श्वास गुदमरुन एक कामगार बेशुद्ध झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. अन्य सहा जणांची प्रकृती स्थिर आहे.

घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आईस फॅक्टरी सिल केली आहे. तसेच या परिसरातील वाहतूकही अन्य मार्गावर वळवण्यात आली आहे. दंडाधिकाऱ्यांनी सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना 15 दिवसांत या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.