नेरळमध्ये भरधाव कारने तीन कॉलेज तरुणांना चिरडले

नेरळ येथे भरधाव एर्टिगा कारने तीन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अन्य दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारचालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कर्जत-कल्याण राज्य मार्गाचे काम अपूर्ण असल्याने अपघात वाढले असून आजच्या दुर्घटनेतील बळीला सार्वजनिक खाते व ठेकेदाराचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा संताप कर्जतकरांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून लोचन धुरी हे अंबरनाथ येथे आपल्या एर्टिगा कारने निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व नऊ वर्षांचा पुतण्यादेखील गाडीमध्ये होता. नेरळ शहरातील पटेल मार्टजवळ सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गाडी आली असता त्यांना डुलकी लागली. त्यामुळे नियंत्रण सुटलेली ही एर्टिगा कार रस्त्याने चालत कॉलेजमध्ये निघालेल्या विद्यार्थ्यांवर जाऊन धडकली. यात मयूर पारधी (16), विशाल दरोडा (17) व मोहन पारधी (16) हे तीनही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. माथेरान घाटरस्त्यावरील जुम्मापट्टीजवळील धस वाडीतील ही तीनही मुले असून नेरळ विद्यामंदिर शाळेत अकरावीत शिक्षण घेतात. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या तीनही विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीने कारचालकाने तत्काळ येथील डॉ. शेवाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु मयूर पारधी याला डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आदिवासी संघटना सरकारविरोधात आक्रमक

बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्ते अपघातात अनेकांचे बळी जात आहेत. अरुंद रस्त्यामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याला अधिकारी व ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप आदिवासी जनजागृती विकास संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी यांनी केला आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात तालुक्यातील अन्य आदिवासी संघटनादेखील आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लाडक्या ठेकेदाराला जाग कधी येणार?

सरकारने कर्जत-कल्याण राज्य मार्गाचे काँक्रीटीकरण करण्याची घोषणा केली खरी, परंतु हे काम रखडले असून ठिकठिकाणी कामाच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व सरकारच्या लाडक्या ठेकेदारामुळे या गोष्टी घडत आहेत. अजून किती बळी गेल्यावर सरकारला जाग येईल? असा संतप्त सवाल शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेरळ शहरप्रमुख बंडू क्षीरसागर यांनी केला आहे.