मुरुडचा एकदरा पूल झाला ‘डेंजर झोन’

आगरदांडा व राजपुरीसह अनेक गावांना जोडणाऱ्या एकंदर पुलाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र सरकारने बिले लटकवल्याने पुलाची दुरुस्ती रखडली. पुलावर सर्वत्र खड्डे पडून चाळण झाली असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच संरक्षक कठडेदेखील मोडकळीस आले आहेत. त्यामुळे हा पूल डेंजर झोनमध्ये गेला आहे.

मुरुड-एकदरा खाडीवर सुमारे ६२ वर्षांपूर्वी हा पूल बांधला आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यावेळी या पुलावर रहदारी वाढते. एकदरा, डोंगरी, माझेरी, आगरदांडा व राजपुरी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पूर्वी या पुलाची डागडुजी केली जात होती, परंतु आज सुमारे ६२ वर्षांत या पुलाची डागडुजी झालेली नाही. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी मंजूर केला. कामाचा ठेका ठाण्याच्या संरचना कंपनीला देण्यात आला. पुलाचे काम सुरू झाले, मात्र बिले न दिल्याने ठेकेदाराने दुरुस्तीचे काम थांबवले. त्यामुळे एकदरा पुलाची अक्षरशः चाळण झाली आहे.

आतापर्यंत झालेल्या कामाचे बिल थकीत असल्याने दुरुस्तीचे काम बंद ठेवण्यात आल आहे. पुलाच्या बेअरिंग बसवणे बाकी आहे. बेअरिंगची मागणी मान्य झाल्यावर कामाला सुरुवात होईल.

एकदरा पुलाच्या झालेल्या कामाचे बिल ठेकेदारांना सादर केले आहे. निधी न जमा झाल्याने मार्च महिन्यापासून सर्वांची बिले बाकी आहेत. निधी जमा झाला की बिले काढण्यात येतील.