
गुरुवारी मध्यरात्री एक वाजता कारने आलेल्या व्यक्तीने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी टाकल्याची घटना घडली. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. अल्ताफ मोहम्मद हुसेन असे त्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो गोवंडी येथे राहत होता. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अल्ताफ कार घेऊन वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आला. तेथे एका बाजूला कार उभी करून अल्ताफ बाहेर आला आणि थेट समुद्रात उडी टाकली.
ही माहिती मिळताच वरळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी वरळी अग्निशमन दल व वांद्रे अग्निशमन दलाला बोलवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यामध्ये बॅटरीच्या सहाय्याने शोध घेतला, परंतु काळोख व भरती असल्याने त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. दरम्यान आज सकाळी अल्ताफचा मृतदेह दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्रकिनारी सापडला.