मुंबईतील महत्वाच्या घडामोडी

शिवसेनेमुळे वाकोल्यातील रहिवाशांना मिळणार शुद्ध पाणी

सांताक्रुझ वाकोला येथे टनेलजवळ मेन लाईनवर मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत होती. परिणामी विभागातील नागरिकांना कमी दाबाने तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच विधानसभा समन्वयक चंद्रशेखर वायंगणकर यांच्या प्रयत्नांमुळे पालिकेकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून सोमवारपासून नागरिकांना जास्त दाबाने आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.

आयडीएफसीच्या सीईओपदी व्ही. वैद्यनाथन यांची पुनर्नियुक्ती

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेडचे एमडी आणि सीईओ म्हणून व्ही. वैद्यनाथन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. आयडीएफसीला वैद्यनाथन यांची 19 डिसेंबर 2024 ते 18 डिसेंबर 2027 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने या पुनर्नियुक्तीसंदर्भात 27 एप्रिल रोजी पत्र दिले होते. त्यावर 19 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने शिक्कामोर्तब केले.

पिस्तुले, काडतुसे घेऊन आलेल्या तरुणाला पकडले, युनिट-9 ची कारवाई

बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन वांद्रे येथे आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे स्टेनलेस स्टीलची दोन देशी बनावटीची पिस्तुले, 10 जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. एक व्यक्ती बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन वांद्र्याच्या महाराष्ट्र नगरात येणार असल्याची खबर युनिट-9 ला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून मनोज गालीपेल्ली (35) या तरुणाला उचलले. त्यांची अंगझडती घेतली असता दोन पिस्तुले, 10 जिवंत काडतुसे मिळून आली. मनोज हा घाटकोपर येथे राहणारा असून त्याने हे शस्त्र कुठून आणले व ते तो कोणाला देणार होता की त्याचा वापर करणार होता याचा पोलीस तपास करत आहेत.