कर्नाटकातील तरुणाची मुंबईत येऊन जबरी चोरी, पोलिसांनी तीन तासांत पकडले

मुंबईत येऊन जबरी चोरी करणाऱ्या कर्नाटकातील गुन्हेगाराला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. दादरला एका तरुणावर वार करून आरोपीने त्याची दुचाकी चोरून नेली होती. पण भोईवाडा पोलिसांनी तत्काळ तपास करत अवघ्या तीन तासांत त्याला पकडले.

प्रभादेवी येथे राहणारा कृणाल कुंडले (34) हा तरुण काही कामानिमित्त दादर पूर्वेकडील दादासाहेब फाळके मार्गावर आला होता. तेथे रस्त्याच्या कडेला ऑक्टिव्हा दुचाकी पार्क करून तो मोबाईलवर बोलत असताना आरोपी तेथे गेला आणि त्याने कृणालची दुचाकी चोरण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा कृणालने प्रतिकार केला असता आरोपीने त्याला हाताने मारहाण करून मग सोबत आणलेल्या चाकूने त्याच्या छाती आणि डोक्यावर वार केले. तसेच कृणालची दुचाकी घेऊन आरोपी पसार झाला.

याबाबत माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन कदम, निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन बोरसे व पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेल तपासले. त्यावेळी तेथे आरोपीचा मोबाईल पोलिसांना मिळाला. मग तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी हा कर्नाटकचा रहिवासी असून त्याचे नाव सोनू चंद्र ऊर्फ मोनू (39) असे आहे व तो कुर्ल्याच्या बैलबाजार परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार बोरसे, अमित कदम, अनिल भोंग व पथकाने तत्काळ कुर्ल्यात जाऊन सोनूला उचलले. त्यांच्याकडून गुह्यात वापरलेला चाकू मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली. अवघ्या तीन तासांत कर्नाटकच्या गुन्हेगाराला भोईवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.