मिंध्यांनी पंधराशे कोटींचा घोटाळा दाबला, जीटीएल महावितरण भ्रष्टाचारविरोधी मंचचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीटीएल कंपनीवर मेहनजर करत त्या कंपनीचे हितसंबंध जोपासत पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा दाबल्याचा खळबळजनक आरोप जीटीएल महावितरण भ्रष्टाचारविरोधी मंचने केला आहे. सामाजिक कार्यकर्ते अॅड. आनंद जोंधळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. केंद्रातले सरकार लहानसहान घोटाळ्यांची ईडी, सीबीआयकडून चौकशी करते. एवढा मोठा घोटाळा दाबला जात असताना तपास यंत्रणा कोठे आहेत, असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

9 नोव्हेंबर 2010मध्ये महाराष्ट्र सरकारने एमएससीटीसीएलद्वारे जीटीएल कंपनीला छत्रपती संभाजीनगर शहराला विद्युतपुरवठा करण्याचे व दुरुस्तीचे कंत्राट दिले होते. मात्र ही कंपनीच दिवाळखोरीत निघाल्याने महाराष्ट्र सरकारने संबंधित कंपनीला दिलेले कंत्राट 10 नोव्हेंबर 2010 रोजी रद्द केले. या प्रकरणात सरकारने मोठा घोटाळा केला. जीटीएल कंपनी महाराष्ट्र सरकारकडे हजार कोटी येणे असल्याचे सांगते, तर सरकार जीटीएल कंपनीकडे आठशे कोटी येण्याचा दावा करते. संभाजीनगरमध्ये आठवड्यातून शंभर तास विद्युतपुरवठा नाही. अशा स्थितीत एसएससीटीएलकडून तिथल्या नागरिकांना हजारो व लाखो रुपयांची वीज बिले आली. या प्रकरणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी करायला सुरुवात केली.

सामाजिक कार्यकत्यांनी माहितीच्या अधिकारातून घेतलेल्या तपशीलातून धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. वीजपुरवठा करणाऱ्या मशिन्सच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. दोन हजार माहिती अधिकाराची कागदपत्रे मिळाली. जीटीएल व एमएससीटीसीएल यांच्या अकांऊटमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाचे थर्ड पार्टी ऑडिट झालेले नाही हे विशेष.

या भ्रष्टाचार प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी संबंधितांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र 2019 पासून त्यांच्या मागणीची कोणत्याच पातळीवर कसलीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेरीस 17 आगस्ट 2021 येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. मात्र 2024 पर्यंत त्यावरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

शिंदे जीटीएलचे मालक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कंपनीचे मालक आहेत, असा गंभीर आरोप याचिकाकर्त्यांनी केला. शिंदे हे जीटीएल कंपनीला वाचवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 2017मध्ये शिंदे हे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घोटाळ्याची फाईल एकनाथ शिंदे दाबत आहेत. या घोटाळ्याची फाईल कोणत्याच पातळीवर एकनाथ शिंदे पुढे जाऊ देत नाहीत, दमनतंत्राचा वापर करत आहेत, असेही ते म्हणाले.