विकेण्डला काळाघोडा परिसरात पर्यटकांना मनमुराद हेरिटेज वॉकचा आनंद घेता येणार आहे. काळा घोडा परिसरातील पाच रस्ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेच्या कालावधीदरम्यान वाहनांसाठी बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा आणि या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा परिसराची ओळख आहे. नागरिक, पर्यटक आदींची या भागात नेहमीच वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर नागरिक तसेच पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’चा आनंद घेता यावा, या उद्देशाने काळा घोडा परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, व्ही. बी. गांधी मार्ग/फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग हे पाच रस्ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेच्या कालावधीदरम्यान वाहनांसाठी बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा आणि या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. काळा घोडा परिसरातील पादचारी मार्ग तसेच सुशोभीकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांचा पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त अनिल पुंभारे यांनी शनिवारी सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, पर्यटक, कर्मचारी आदींशी संवाद साधला. तसेच हा परिसर अधिकाधिक सुंदर करण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया, सूचना आदी जाणून घेतल्या.