नागपूरमधील अत्याचारी नराधमाच्या मुसक्या आवळल्या, शिवसेनेच्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणा हादरली

आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी नागपूर शिवसेनेच्या वतीने शनिवारी पारडी पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात येणार होता. शिवसेनेच्या दणक्यामुळे पोलीस यंत्रणा हादरली असून आंदोलनाच्या काही तास अगोदरच पोलिसांनी फरार आरोपीला अटक केली.

नागपूरमध्ये 15 सप्टेंबर रोजी आठ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार केला होता. गेल्या पाच दिवसांपासून हा नराधम फरार होता. या नराधमाला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख किशोर पुमेरिया यांच्या नेतृत्वात शेकडो संतप्त शिवसैनिकांनी पारडी पोलीस ठाण्याला घेराव घालत पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांना जाब विचारला. तेव्हा पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी शुक्रवारी रात्रीच आरोपीला अटक केल्याचे सांगितले.

नराधम 62 वर्षीचा असून त्यांचे नाव गणपत जयपूरकर असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी आणि त्याच्याविरोधातील पुरावे व्यवस्थित गोळा करावे अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पुमेरिया, महिला आघाडी संपर्पप्रमुख अंजुषा बोधनकर, सुशीला नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक सुरेखा खोब्रागडे, युवासेना विस्तारक संदीप पटेल, हरी बाणाईत, उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू, पूर्व नागपूर विधानसभा संघटक महेंद्र काठाणे, उपशहरप्रमुख अजय दलाल, अरविंद सिंग राजपूत, समित कपाटे, जीवन वर्मा, मंगेश ठाकरे, अमोल हूड, मंगेश मेश्राम, शारदा मेश्राम, रंजना राजपांडे, मीना अडकणे आदी उपस्थित होते.