मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीही ओबीसींबद्दल बोलत नाहीत. ओबीसी यांना फक्त राजकारणात तोंडी लावण्यासाठी लागतात. निवडणुकीत मात्र नंबर दोनचे धंदे करणारांना तिकिटे देतात. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांची कोणती पात्रता पाहून त्यांना तिकीट दिले? दारूचे गुत्ते चालवणारांना लोकसभेत पाठवता आणि सामाजिक न्यायाच्या गप्पा मारता, असे शरसंधान प्रा. लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांवर केले.
ओबीसी आरक्षण बचावसाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्रीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या वेळी पत्रकारांशी बोलताना प्रा. हाके यांनी मुख्यमंत्र्यांच्या पक्षपाती वर्तणुकीवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकाच समाजाची बाजू घेऊन घटनेशी द्रोह करत आहेत. ओबीसी यांना फक्त राजकारण करण्यासाठी लागतात. निवडणुकीत तिकीट दोन नंबरचे धंदे करणारांना देतात आणि सामाजिक न्यायाची भाषा करतात. छत्रपती संभाजीनगरात संदिपान भुमरे यांची कोणती पात्रता पाहून त्यांना तिकीट दिले? भुमरेंना इंग्रजी तरी येते का? असा टोलाही प्रा. लक्ष्मण हाके यांनी लगावला. धनगर वेगळा कसा आहे, धनगर समाज ओबीसीतून साडेतीन टक्के आरक्षण घेतो, तो ओबीसीतून वेगळा कसा, असा सवालही प्रा. हाके यांनी केला.