शेतातील पंपाचे वीज बिल आम्ही तीन पिढ्यांपासून भरलेले नाही. डीपी जळाली की इंजिनियरला एक हजार रुपये देऊन डीपी दुरुस्त करून घ्यायची, अशी वीजचोरीची जाहीर कबुली आज मिंधे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. केंद्रीय मंत्र्यांच्या या धक्कादायक विधानाने केंद्रातील मोदी-शाह सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये तिसर्यांदा विजयाची हॅट्ट्रिक व केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झालेल्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे आणि बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा आज शनिवार, २१ सप्टेंबर रोजी मलकापुरात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना प्रतापराव जाधव यांनी हे धक्कादायक विधान केले.
या भाषणात प्रतापराव जाधव यांनी वीज बिल बुडविल्याची जाहीर कबुलीच दिली. महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना ते म्हणाले की, आता आम्ही शेतकर्यांचे वीज बिल माफ केले आहे. खरं सांगा शेतकर्यांनो आपण वीज बिल भरत होतो का? माझ्या शेतातील पंपाचे वीज बिल आम्ही गेल्या तीन पिढ्यांपासून भरलेले नाही. डीपी जळाली की इंजिनियरला एक हजार रुपये द्यायचे आणि डीपी दुरुस्त करून घ्यायची. यापुढे दिवसाही शेतकर्यांना वीज देणार असून, सौर ऊर्जांचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आल्याचेही ते म्हणाले.