दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एका तरुणाला आयपीएस अधिकारी बनवतो म्हणून दोन लाख रुपयांना चुना लावला आहे. या तरुणाला आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेश दिला आणि पोलिसांत रुजू झाला असे सांगण्यात आले. पण रुजू होण्यापूर्वीच पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. बिहारमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 18 वर्षांचा मिथलेश कुमार हा लखीसराय जिल्ह्यात रहिवासी. त्याच भागात राहणाऱ्या मनोज सिंहने त्याला पोलिसांत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी मनोजने मिथलेशकडे दोन लाख तीस हजार रुपये मागितले. तेव्हा मिथलेशने आपल्या मामाकडून दोन लाख रुपये घेऊन मनोजला दिले.

त्यानंतर मनोज सिंहने मिथलेशच्या अंगाचे माप घेतले. दुसऱ्या दिवशी त्याला बोलावलं आणि त्याला आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेश आणि खोटं पिस्तुल दिलं. आणि ड्युटी जॉईन करायला सांगितली. मनोज घरी आला आणि त्याने आईला ही खुशखबर सांगिली. दुसऱ्या दिवशी तो जवळच्या स्थानकात ड्युटी जॉईन करायला जात होता, तेव्हा रस्त्यातच त्याला पोलिसांनी हटकलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मिथलेशला पोलिस स्थानकात नेलं. तेव्हा मिथलेशने झाला प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी मिथलेश आणि मनोज सिंहला अटक केली आहे.