नालासोपारा स्थानकावर टीसीवर एका प्रवाशाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात टीसी जखमी झाला असून आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
गुरुवारी विजय पंडित सकाळी नालासोपारा प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचे तिकिट तपासत होते. तेव्हा एक प्रवासी फर्स्टक्लास डब्यातून खाली उतरला. पंडित यांनी या प्रवाशाकडे तिकीट मागितले. तेव्हा या प्रवाशाकडे सेकंड क्लासचे तिकिट होते. तेव्हा पंडित यांनी प्रवाशाला सांगितले की तुमच्याकडे सेकंड क्लासचे तिकिट आहे आणि तुम्ही फर्स्ट क्लासने प्रवास केला आहे. त्यामुळे तुम्हाला 345 रुपयांचा दंड भरावा लागेल. तेव्हा प्रवाशाने आपल्याकडे फक्त 210 रुपये असल्याचे सांगितले. तेव्हा पंडित यांनी दया दाखवत 150 रुपये दंड आकारला. त्यानंतर प्रवासी निघून गेला.
काम संपवून पंडित जेव्हा ऑफिसच्या दिशेने जात होते तेव्हा या प्रवाशाने मागून हॉकी स्टिकने पंडित यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पंडित जखमी झाले, आरोपी तिथून पळून गेला. पंडित यांच्या सहकर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी वसई पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे.