सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय

एका कॅब चालकाने वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी घेत आपले जीवन संपवल्याची घटना शुक्रवारी घडली. अल्ताफ मोहम्मद हुसेन असे मयत कॅब चालकाचे नाव आहे. अल्ताफ हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो मुंबईतील गोवंडी परिसरात भावासोबत राहत होता. अल्ताफच्या मोबाईलवरून त्याच्या भावाशी संपर्क साधत पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

अल्ताफ ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप्सचा वापर करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ऑनलाईन गेममधून आर्थिक नुकसान झाल्याने अल्ताफने हे टोकाचे पाऊल उचलले असावा असा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्या अनुषंगाने सखोल तपास करत आहेत.

वांद्रे वरळी सी लिंकवर पोल क्रमांक 83 आणि 84 दरम्यान एका व्यक्तीने आपले वाहन थांबवून समुद्रात उडी मारल्याची माहिती वरळी पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांचे गस्त पथक सी-लिंककडे वळवण्यात आले. तर वरळी आणि वांद्रे येथील अग्निशमन दलाच्या दोन पथकांना शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आले.

पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता आत त्यांना मोबाईल आणि कागदपत्रे सापडली. या मोबाईलवरून पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क साधला. काही वेळाने वरळी किल्ल्याजवळ अल्ताफचा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटवून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.