Nagar News – नगर जिल्हा सहकारी बँक कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा आरोप

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूठभर कारखानदारीमुळे अडचणीत आली असून कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, असा आरोप ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी केला आहे. शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी संपन्न झाली. यावेळी सभेत मार्गदर्शन करताना ढाकणे यांनी आरोप केला.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या मालकीची बँक आहे. या बँकेची अवस्था आज काय आहे हे लवकरच जनतेला कळेल. ही बँक जिल्ह्यातील मुठभर चार-पाच कारखानदारांची नाही. ही बँक बुडाली तर शेतकर्‍यांना कर्ज देणाऱ्या सोसायट्या अडचणीत येतील आणी जिल्ह्यातील शेतकरी डबघाईला येतील.

स्वर्गीय बबनरावजी ढाकणे साहेबांनी संकटावर मात करून कारखाना उभा करून यशस्वीपणे चालवला. सहा वर्ष शेतकऱ्यांचे, कामगारांचे, ऊसतोड मजुरांचे आणि वाहतुकदारांचे पैसे वेळेवर दिले आहेत. काही अडचण आली आहे ती थोड्याच दिवसात सुटणार असल्याचे सांगितले आहे.

केदारेश्वरची निर्मिती करताना सामान्य माणसांना वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी झाली आहे. शेकडो वर्षांपासून मानव जातीचा इतिहास हा वर्ग संघर्षाच्या लढ्याचा आहे. आहिरे आणि नाहिरे वर्गाचा आहे. म्हणून नाहिरे वर्गाला सोबत घेवून गरीब माणसांना मोठं करण्याचा स्वर्गीय ढाकणे साहेबांचा वारसा आपण पुढे नेत आहोत. पक्षीय राजकारणात जरूर त्रास द्या पण केदारेश्वर ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे, त्यामध्ये त्रास देवू नका अशी विनंतीही ढाकणे यांनी केली.

जिल्ह्यातील इतर कारखान्यांवर 500 कोटींच्या पुढे कर्ज आहे. हा कारखाना लवकरच कर्जमुक्त करून सभासदांना लाभांश देण्याचा मानस आहे. कोणत्याही परिस्थितीत राजकीय लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकूच पण लढाईसाठी खंभीर पाठबळ द्यावे असे, आवाहनही ढाकणे यांनी केले.