मुख्यमंत्री जाताच कार्यक्रमस्थळी मासे पकडण्यासाठी उडाली झुंबड, 45 हजाराचं नुकसान

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शनिवारी सहरसा येथील कार्यक्रमात लोकांची मासे पकडण्यासाठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सहरसा येथील अमरपूरमध्ये विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात मत्स्यव्यवसाय विभागातर्फे बायोफ्लॉक लावण्यात आले होते. कार्यक्रम आटोपून नितीश कुमार हेलिकॉप्टरने रवाना होताच उपस्थित नागरिकांनी बायोफ्लॉककडे धाव घेतली. मासे पकडण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली.

लोकांनी बायोफ्लॉक तोडून सर्व मासे पळवून नेले. यामुळे आयोजकाचे 45 हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी उपस्थित लोकांनी आपण नितीश कुमार यांना पाहण्यासाठी नाही तर मासे गोळा करण्यासाठी आल्याचे सांगितले.