भाजप आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

बलात्कार, लैंगिक छळ आणि धमकी प्रकरणी कर्नाटकातील भाजपचे आमदार एन मुनिरत्ना याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. मुनिरत्ना याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुनिरत्ना कर्नाटकातील राजराजेश्वरी नगरचा भाजपचा आमदार आहे.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एका 40 वर्षीय महिलेने मुनिरत्ना याच्याविरोधात बंगळुरु ग्रामीणमधील काग्गलीपुरा पोलिसात बलात्कार आणि छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. महिलेच्या फिर्यादीनुसार मुनिरत्ना विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

महिलेच्या तक्रारीनंतर भाजप आमदारासह अन्य 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काग्गलीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खासगी रिसॉर्टमध्ये ही घटना घडल्याचा आरोप महिलेने केला आहे.

आमदाराला जातीवाचक शिवीगाळ करण्यासह विविध आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन लाख रुपयांचा जातमुचलक आणि दोन जामीन भरण्याच्या अटीवर त्याचा अर्ज स्वीकारला. तसेच पुराव्याशी छेडछाड किंवा तपासात अडथळा आणू नये, यासाठी विशेष सूचना त्याला देण्यात आल्या होत्या. मात्र तुरुंगातून बाहेर येताच बलात्काराच्या प्रकरणात आमदाराला पुन्हा अटक झाली.