अभिप्राय- रम्य आठवणींना शल्याची किनार

>> राहुल गोखले

व्यक्ती सामान्य असो किंवा असामान्य, आयुष्य जसे पुढे पुढे जाते तशा त्या व्यक्तीपाशी आठवणी आणि अनुभवांचे गाठोडे जमा होत असते. प्रतिथयश उद्योग समूहातील एका कंपनीतून वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले प्रदीप मेहेंदळे यांनी अशाच कटू-गोड आठवणींना ‘शत जन्म शोधितांना’ या पुस्तकातून उजाळा दिला आहे. प्रत्येकाचे आयुष्य भिन्न असले तरी काही अनुभव साधर्म्य असणारेही असतात याचा प्रत्यय वाचकांना हे कथन वाचताना येईल.

वडिलांकडून आजोळ जळगावचे तर आईकडून आजोळ हे दादरचे. लेखकाचे लहानपण मुंबईतच गेल्याने साहजिकच दादरच्या आजोळच्या आठवणी अधिक आहेत आणि लेखकाने त्या जिव्हाळ्याने सांगितल्या आहेत. मालाडला गायत्री भुवन नावाच्या दोन खोल्यांच्या घरात लेखकाचे पूर्वायुष्य गेले. याच गायत्री भुवनशी निगडित चांगल्या-वाईट घटना लेखकाने कथन केल्या आहेत. लेखक दोन-तीन वर्षांचे असताना त्यांच्या लहान भावाचा झालेला मृत्यू, बालमित्राचे झालेले निधन अशा झाकोळ निर्माण करणाऱया आठवणींबरोबरच त्या परिसरातील सुखावणाऱया आठवणींमध्ये लेखक रमले आहेत. सनदी लेखापाल (सीए) पर्यंत शिक्षण घेऊनही लेखकाने कारकीर्द मात्र तंत्रज्ञानाच्या प्रांतात करण्याचा निर्णय घेतला. बीएसईएसमध्ये संगणक विभागात लेखकाने काम करण्यास सुरुवात केली आणि त्या क्षेत्रात गती असल्याने बरीच प्रगतीही केली. एकेक पायऱया चढत वरिष्ठ पदापर्यंत मारलेली मजल हा सगळा आठवणींचा पट लेखकाने उलगडून दाखविला आहे.

या काळात मिळालेले सहकारी, जादूचे प्रयोग करण्यापासून चित्रकलेपर्यंत जोपासलेले छंद इत्यादींवर लिहिताना लेखकाने ‘हा माझा मार्ग एकाला’ चित्रपटात पुढे सचिन पिळगावकरने केलेली भूमिका अगोदर आपल्याकडे चालून आली होती अशी रंजक आठवण सांगितली आहे. 34 वर्षे नोकरी केल्यानंतर आपण निवृत्त झालो आणि बाराशे रुपयांच्या स्टायपेंडवरून निवृत्त होताना आपले वेतन काही लाखांत होते हे लेखकाने समाधानाने लिहिले आहे. या सर्व कथनात लेखकाची काहीशी निराशा आणि आयुष्याने दिलेल्या अगतिकतेबद्दलची सल लपून राहिलेली नाही. अनुभवांचे-आठवणींचे प्रांजळपणे कथन करतानाच लेखकाच्या रम्य आठवणींना शल्याची किनार असल्याचे मात्र पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते.

पुस्तक ः शत जन्म शोधितांना
लेखक ः प्रदीप श्रीधर मेहेंदळे
प्रकाशक ः नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
पृष्ठे ः 159 ? मूल्य ः रुपये 275