कथा एका चवीची- आनंदाचा सदिच्छा दूत

>> रश्मी वारंग

विविध देवीदेवतांना नैवेद्य दाखवण्याचा किंवा सर्वसामान्यांसाठी शुभवार्ता सांगण्याचा एक स्वादिष्ट मार्ग म्हणजे पेढे. लाडवाप्रमाणेच पेढे हे समस्त हिंदुस्थानींना जोडणारे मिष्टान्न आहे. दुग्ध संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असणाऱया या देशात म्हणूनच पेढे लोकप्रिय आहेत.

नुकताच आपण आपला लाडका गणेशोत्सव उत्साहात पार पाडला. मोदक, लाडू, पंचपक्वान्नांचं ताट भोजनप्रिय अशा गणेशाला प्रचंड प्रिय. गणपतीच नाही, पण विविध देवीदेवतांना नैवेद्य दाखवण्याचा किंवा सर्वसामान्यांसाठी शुभवार्ता सांगण्याचा एक स्वादिष्ट मार्ग म्हणजे पेढे. जन्म, बारसं, बढती, कोणत्याही शुभकार्यात अग्रणी असणाऱया पेढय़ांची ही गोष्ट.

दुग्ध संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असणाऱया या देशात दुग्धजन्य पेढे लोकप्रिय न ठरतात तर आश्चर्य! संस्कृत शब्द ‘पिंड‘ अथवा ‘पिंडक’ यापासून ‘पेढे’ या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. आयुर्वेदापासून ते चरक संहिता, भोजन कुतूहल या ग्रंथांमध्ये पेढय़ांचा उल्लेख आढळतो. चरक संहितेत पिंडकासह विविध मिठायांचा उल्लेख होतो. त्यात पेढय़ांचं वर्णन ‘खाण्यासाठी जड‘ असे केलेले दिसते, तर ‘भोजन कुतूहल’ या ग्रंथात दुग्ध आणि शर्करा यांच्या जोडीने वेलची, लवंग यांचा वापर करून बनवलेल्या मिठाईचा उल्लेख येतो, जो पेढय़ांशी अगदी मिळता जुळता आहे. संस्कृत साहित्यात पेढय़ांचा उल्लेख विविध नावांनी होतो. कधी त्यांना ‘दुग्धपिंडक’ म्हटलं आहे तर कधी ‘क्षीरवाटी’ या नावाने संबोधले आहे. आचार्य सुषेण यांच्या ‘आयुर्वेद महोदधी’ या ग्रंथात पेढय़ांचा उल्लेख कृतन्न वर्गात होतो. कृतन्न वर्ग म्हणजे वात, पित्त, कफ या दृष्टीने अन्नाचे झालेले वर्गीकरण.

याच पारंपरिक मिठाईला सध्याच्या काळात आपण विविध रूपांत, स्वादांत अनुभवतो, पण त्यातही काही पेढे त्यांच्या अनोख्या चवीमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यात मथुरेच्या पेढय़ांचा अव्वल क्रमांक लागतो. हे पेढे इतके खास का? तर दुधाचा खवा बनवण्याची या पेढय़ांची पद्धत खास आहे. या खव्यात साखर आणि वेलचीपूड घोळून पेढय़ांची अप्रतिम चव सिद्ध होते. कृष्णजन्माष्टमीला या पेढय़ांचा कृष्णाला खास भोग चढवला जातो. इथल्या भागात प्रचलित म्हण बघा…‘मथुरा का पेडा और छत्तीसगढ का खेडा’. हे दोन्ही पदार्थ जगात भारी. खेडा ही एक प्रकारची भाजी आहे.

मथुरेच्या पेढय़ांनंतर धारवाडी पेढय़ांचाही दबदबा विलक्षण आहे. 18 व्या शतकातील प्लेगच्या साथीपासून वाचण्यासाठी उत्तर प्रदेश उन्नाव भागातील रामरतनसिंह ठाकूर आपल्या कुटुंबासह धारवाडला आले. त्या कुटुंबाने पेढय़ांचा व्यवसाय सुरू केला. अस्सल धारवाडी म्हशीच्या दुधापासून बनवलेले हे पेढे फक्त धारवाड, बेळगावच नाही तर हिंदुस्थानभरात लोकप्रिय आहेत. या दुधाच्या खास चवीमुळे हे पेढे वेगळे ठरतात.

त्यानंतर आपल्या सातारच्या कंदी पेढय़ांचा विसर पडून चालणार नाही. या कंदी पेढय़ांचं नातं ब्रिटिश अधिकाऱयांशी आहे हे सांगून खरं वाटणार नाही. साताऱयातील पाटण तालुक्यात रानावनात चरणाऱया गाईम्हशींच्या दुधापासून खास पेढे तयार होत. दुधाच्या घट्टपणामुळे या पेढय़ांची चव अनोखी होती. त्या भागातील ब्रिटिश अधिकारी खाण्याचे शौकीन होते. ते नियमितपणे नवनव्या गोड पदार्थांचा शोध घेत. त्यांच्या खाण्यात हे पेढे आले. त्यांना ते प्रचंड आवडले. ते पेढे करंडीतून नेले जात. करंडीतील पेढय़ाचा ब्रिटिश अपभ्रंश होऊन ते ‘कंदी’ पेढे झाले. तुळशीराम मोदी या हलवायाने थेट लंडनमध्ये या पेढय़ांची मोठी जाहिरात केली होती. त्यामुळे ते जगभरात प्रसिद्ध झाले.

विविध प्रांतांतील पेढय़ांच्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील. लाडवाप्रमाणेच पेढे हे समस्त हिंदुस्थानींना जोडणारे मिष्टान्न आहे.