>>सायली भोसले
सातारा जिल्ह्यातील बावधन या निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावातील बगाड यात्रा आता सर्वदूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहे. गुलालात उधळणीने माखलेल्या या उत्सवात ‘काशिनाथाचं चांगभलं…’ म्हणत पाहिलेल्या बगाड यात्रेचा हा वृत्तांत.
बगाड यात्रा.. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा. खूप जणांकडून ऐकले होते या यात्रेबद्धल पण जाण्याचा काही योग येत नव्हता. मी तळकोकणातील असल्यामुळे ही यात्रा पाहण्याची उत्सुकता मला मात्र नक्कीच होती. सातारा जिह्यातील बावधनची बगाड यात्रा सर्व जगभरात प्रसिद्ध आहे. ही बावधन बगाड यात्रा बघण्याचा योग नुकताच आला. तिन्ही बाजूने डोंगरांच्या कुशिमध्ये वसलेल्या बावधनमध्ये मैत्रीण रोहिणीच्या घरी मुक्काम करीत या यात्रेचा अनुभव घेतला.
आम्ही पोहोचलो तो यात्रेचा पहिला दिवस होता. रोहिणीने त्या दिवशी पुरण पोळी, कटाची आमटीचा बेत आखला होता. तिच्या घरासमोरून काशिनाथ देवाच्या मुखवट्याची वाजत गाजत मिरवणूक निघाली होती. घराच्या अंगणातूनच देवाच्या मुखवट्याचे दर्शन घेतले व मंदिराच्या दिशेने निघालो. वाटेत गुलाल घेतला आणि मंदिरात शिरलो. त्याच वेळी काशिनाथ म्हणजेच भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांच्या लग्नाचा सोहळा पार पडत होता. मंदिराच्या गाभाऱ्यात वर्षातून यात्रेच्या या दोन दिवसांतच महिलांना प्रवेश असतो. त्यामुळे महिलांची तोबा गर्दी झालेली दिसत होती. कसेबसे गर्दीतून वाट काढत आम्ही मंदिराच्या गाभ्रायात पोहचलो आणि देव काशिनाथाचे दर्शन घेतले. त्याचवेळी यात्रेमध्ये जी व्यक्ती बगाडय़ा म्हणून ठरवली जाते तिचा पोषाखही त्या मंदिरात आणला होता.
या बगाड्याला होळीनंतर यात्रेच्या आधी पाच दिवस मंदिराच्या परिसरात ठेवले जाते. नवसकारी जे असतात त्यामधून देवाला कौल लावून हा बगाड्या ठरविला जातो. मंदिराच्या परिसरात बगाडाचा गाडा तयार करण्याची जय्यत तयारी सुरू होती. या बगाडच्या गाडय़ाला दगडांचे चाक तयार केले जातात. या गाडय़ाला 12 खिल्लारी बैलांचे जोड बांधतात आणि या बैलांच्या साहाय्याने हा बगाडचा गाडा हा ओढला जातो. हा संपूर्ण बगाड बाभळीच्या झाडापासून तयार करतात. ब्रिटिश काळाच्या आधीपासून म्हणजे तब्बल 350 वर्षापासून सुरू असलेली ही यात्रेची परंपरा. यात्रेची तयारी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमी ला सुरू होते. यानंतर भैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन आम्ही ज्योतिबाच्या मंदिरात गेलो. ज्योतिबाच्या मंदिरात ज्योतिबा देव आणि त्यांची बहीण या दोघांचे दर्शन घेतले.
यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजेच छबिन्यादिवशी हा संपूर्ण गाडा तयार केला जातो. रात्री चंद्रोदयानंतर देवाच्या पालख्या वाजत गाजत निघाल्या होत्या आणि त्याचसोबत झांज पथक, ढोल, सनई, डफडेच्या आवाजात या पालख्या गावभर फिरत होत्या. यासोबत आगीचे आणि दांडपट्टाचे खेळही सुरू होते. फुलांच्या छत्र्या देवापुढे फिरवल्या जातात. छबिनादरम्यान देवावर गुलाल वाहतात. मध्यरात्री या पालख्या ब्राम्हण वाडय़ात येऊन पोहोचल्या आणि तेथेच गोंधळी ने बगाड आणि त्यामागे असलेली देवाची आख्यायिका कथन केली. या पालख्यांसोबत असलेले बगाडचे मानकरीसुद्धा गावामध्ये फिरतात. बगाडामध्ये प्रत्येक समाजाला म्हणजेच बारा बलुतेदारांना मान देण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच यात्रेच्या दिवशी या बगाडचे कृष्णा नदीच्या काठी नेऊन त्याची पूजा केली जाते. कृष्णामाईची ओटी भरून बगाड रथास प्रारंभ होतो.
सर्व पुरुष आणि महिला मंडळी पांढ्रया रंगाचा पेहराव करून बगाड पाहण्यासाठी नदीकाठी जातात. नदीवरून शेतामध्ये हे बगाड आणले जाते. या बगाडवर बगाडचे मानकरी म्हणजेच बगाड्याला लोखंडी गळात अडकवले जाते आणि त्यांच्या हातात कडुनिंबाचा पाला दिला जातो. “काशीनाथचे चांगभलं’’ अशी गर्जना करून या यात्रेला सुरुवात केली जाते. त्याचसोबत हा बगाड व्यवस्थित चालावे याकरिता बगाडच्या शिडेवर एक व्यक्ती तेल घालण्यासाठी चढलेला असतो. तसेच गाड्यावर अनेक मानकरी बसलेले असतात. 12 खिल्लारी बैलांच्या जोड्या या गाडय़ाला जोडलेल्या असतात. या गाड्याला जोडण्यासाठी वाटेमध्ये अनेक शेतकरी शिवारात आपले बैल घेऊन उभे असतात. कोणत्याही यंत्राचा वापर न करता फक्त हवेची दिशा, बैलांची ताकद आणि गाडा ओढण्यासाठी लोकांनी केलेला आटापिटा, उधळलेल्या बैलांमुळे लोकांची झालेली धावपळ हे सर्व खरेच पाहण्यासारखे असते. या सगळ्या क्षणांचे आम्हाला साक्षीदार होता आले.
घरी आल्यानंतर रोहिणीच्या सासूच्या आग्रहाखातर आम्ही वाई येथील गणपती मंदिरात गेलो. गणपतीचे दर्शन घेऊन गावातीलच एकच ठिकाणी असलेल्या पाचीदेऊळांचे दर्शन घेतले. उंचावर असलेले ही पाच देवळे संध्याकाळच्या वेळेस खूपच रमणीय दिसत होती. या देवळांच्या सानिध्यात लाभलेली शांतता खूपच भावून गेली. यात्रेनंत रात्रीच्या वेळेस बोकडांचा बळी दिला जातो आणि हा मटणाचा प्रसाद म्हणून घरोघरी शिजवला जातो. गाडीची वेळ लवकरच ची असल्याने आम्ही घरातून लवकर निघालो. घरातील सर्वचजण राहण्याचा आग्रह करत होते. दाभाडे दादा आणि त्यांच्या आई तर उद्याचे अगदी घराजवळुन बगाड जाणार आहे ते पाहूनच जा असे सतत सांगत होते. पण पर्याय नव्हता. राहणे शक्य नव्हते. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.
आम्ही नको म्हणत असताना देखील त्यांचे आलेले पाहुणे सोडून दादा आम्हाला बस स्टँडपर्यंत पोहोचवायला आले होते. सर्वांना सोडून जायची ईच्छा नव्हती पण जाणे तर भाग होते. दोन दिवसांतील आलेला थकवा बराच जाणवत होता. बसमध्ये शांत झोपी गेलो. इतक्या छान अनुभवांचे साक्षीदार होण्याकरिता रोहिणीला मनोमन धन्यवाद देत आणि मनात खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही परत मुंबईला प्रयाण करत होतो.
– [email protected]