>> डॉ. मुकुंद कुळे
मारी सेल्वराजचा ‘कर्णन’ हा तामीळ सिनेमा ठळकपणे दलित-सवर्ण लढ्याची कथा उभी करतानाच सुर-असुर, अभिजन-बहुजन हा संस्कृती संघर्षही अधोरेखित करतो आणि त्यासाठी परंपरेतील प्रतीकांचीच नेमकी निवड करतो. म्हणूनच ‘कर्णन’ चित्रपटाकडे केवळ दलित-सवर्ण परिप्रेक्ष्यातून पाहणं म्हणजे त्याच्या व्यापकतेला वेसण घालण्यासारखं आहे.
‘कांतारा’ सिनेमा त्यातील अनोख्या वातावरण निर्मितीमुळे आणि पारंपरिक पिशाच विधींच्या केलेल्या प्रभावी वापरामुळे गाजला. मात्र ‘कांतारा’च्या फार आधी मारी सेल्वराजचा ‘कर्णन’ हा तामीळ सिनेमा प्रदर्शित झाला होता. अनेकांना हा सिनेमा केवळ दलित-सवर्ण संघर्ष अधोरेखित करणारा वाटला होता, पण प्रत्यक्षात त्याचा परिप्रेक्ष्य त्यापेक्षाही व्यापक होता. तो केवळ दलित-सवर्ण संघर्षाभोवती फिरत नाही. दलित-सवर्ण संघर्ष हा या सिनेमाचा एक महत्त्वाचा आयाम असला तरी खरा आयाम संस्कृती संघर्ष हा होता आणि त्यासाठीच सिनेमात विविध प्रतिमा-प्रतीकं आणि मिथकांचा यथेच्छ वापर करण्यात आला होता. ही प्रतीकात्मकता हीच या सिनेमाची मोठी ताकद आहे.
प्रतीकं ही एकूणच मानवाच्या सांस्कृतिक जीवनाचा कधीच कापून टाकता न येणारा भाग आहेत. पार आदिम काळापासूनचं संचित या प्रतीकांत दडलेलं असतं. ती संपली किंवा टाकून दिली असं म्हणून त्यांना दूर लोटता येत नाही. रूप बदलून, घाट बदलून ती काळाबरोबर पुनरावृत्त होत राहतात. आदिम ते अद्यतन प्रवास करत नित्यनूतन राहतात. ‘कर्णन’ सिनेमातील प्रतीकं अशीच आहेत. ती पुराकथा-लोककथांमधून वहन होत आलेली आहेत तरी त्यांनी त्यांची आजच्या काळातील उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. नजरेला सरळ सरळ दिसणारा दलित-सवर्ण संघर्ष सिनेमात आहेच. त्याविषयी वेगळं काही भाष्य करण्याची गरज नाही, परंतु सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच, आजूबाजूने वाहनं जात असतानाही कोणतीच मदत न मिळाल्यामुळे मृत पावलेली कर्णनची धाकटी बहीण आणि तिचं देवतेत झालेलं रूपांतर, गावकऱयांचा शिरोविहीन देव, हवेत अधांतरीच मासा कापण्याचा वार्षिक ग्रामविधी ते घारीने कोंबडीचं पिलू उचलणं आणि तिच्याशी कर्णनच्या आईने मांडलेला उभा दावा, हत्ती, घोडा, गाढव आणि सिनेमाच्या अगदी शेवटी गाढवाने आपल्या मातेजवळ जाणं… या सगळ्याला ‘कर्णन’ सिनेमात काही ना काही प्रतीकात्मक अर्थ आहे.
सिनेमात सुरुवातीलाच दिसणारा गावकऱ्यांचा शिरोविहीन देव सिनेमातील संस्कृती संघर्ष ठळकपणे अधोरेखित करणाराच आहे. उच्चवर्णीयांशिवाय कुणाकडेही ज्ञानाची मत्तेदारी जाऊ नये यासाठी पूर्वीच्या काळी काटेकोर बंदोबस्त केला जायचा. त्यासाठी ज्ञानाची कास धरणाऱ्या निम्न स्तरांतील व्यक्तीचा थेट शिरच्छेदच केला जायचा (राम-शंबुक उदाहरण साऱयांनाच ठाऊक आहे.) किंबहुना, तुम्हाला फक्त धडच आहे, डोकं नाही हे सातत्याने उच्चवर्णीयांकरवी खालच्या जातीच्या लोकांवर बिंबवलं जायचं. याचाच परिणाम म्हणून अनेक आदिवासी-दलित जमातीच्या देवता या पूर्वी शिरोविहीन असायच्या. ‘कर्णन’ चित्रपटातील शिरोविहीन देव याच परंपरेवर भाष्य करतो. मात्र सिनेमाच्या शेवटी आमच्या धडावर आता आमचंच शीर असेल, असा सूचक संदेशही हा सिनेमा देतो.
अगदी लहान वयात रस्त्यावर मृत पावलेली कर्णनची बहीण ग्रामदेवतेच्या रूपात दिसणं हा तर आपल्या लोककथांतील अतिशय लोकप्रिय आदिबंध आहे. काही कारणाने अकाली मृत पावलेल्या किंवा मारल्या गेलेल्या व्यक्ती देव वा झाड रूपाने जिवंत राहतात अशा अनेक कथा लोकवाङ्मयात सापडतात. विशेषत जीवनाचा कोणताही अनुभव न घेतलेल्या लहान मुली मृत पावल्या असतील तर त्यांना देवतास्वरूप मानून त्यांच्या नावाचे दगड आपल्या घराच्या आवारात पुरण्याची परंपरा अगदी प्राचीन आहे. ‘कर्णन’ चित्रपटातील मुलगी देवतेच्या स्वरूपात दिसते ती त्यामुळेच. मात्र यातही एक गोम अशी आहे की, निम्न जातींच्या देवता या नेहमीच काहीशा उग्ररूपा असतात, तशी या सिनेमातील देवताही उग्ररूपा आहे आणि ती गावकऱयांना एक प्रकारे लढण्याचं बळ पुरवणारी आहे. महत्त्वाचं म्हणजे या देवतेचं वाहन गाढव आहे. ‘कर्णन’ सिनेमात अनेक दृश्यांत पुढचे दोन पाय दोरीने बांधलेत अशा रूपातलं गाढव दुडक्या चालीने चालल्याचं दाखवलं आहे आणि कर्णन ज्या वेळी अत्याचाराने पेटून उठतो तेव्हा तो त्या गाढवाच्या पुढच्या दोन पायांतील दोर दगडाने ठेचून तोडतो आणि एकाच वेळी ते गाढव आणि तो स्वतही उधळतो. मात्र सिनेमातील गाढवाचं अस्तित्त्व तेवढ्यापुरतंच सीमित नाही. हे गाढव त्या ग्रामदेवतेचं वाहनही आहे. आपल्याला देवीचं वाहन म्हणून वाघ किंवा सिंहच ठाऊक असतो, परंतु उग्ररूपा-तमोगुणी देवतेचं वाहन गर्दभ म्हणजेच गाढवही असतं, ते फार कमी लोकांना ठाऊक आहे. म्हणूनच सिनेमात गाढव या प्रतीकाचा वापर अगदी यथोचित केला आहे.
‘कर्णन’ सिनेमातील कर्ण, दुर्योधन, यम, द्रौपदी अशी पात्रांची नावं पाहिली तरी त्यातील वेगळेपणा आपल्या लक्षात येतो. सिनेमात पोलीस स्टेशनमधील एक दृश्य आहे. त्या दृश्यात पोलीस इन्स्पेक्टर या ग्रामस्थांना त्यांची नावं विचारतो तेव्हा गावकऱयांनी आपली महाभारतातील राजांची नावं सांगितल्यावर तो पोलीस इन्स्पेक्टर हसतो आणि म्हणतो, “राजांची नावं ठेवली म्हणून तुम्ही मोठे झालात काय?’’ म्हणजे दलितांनी देवादिकांची-राजांची नावं ठेवलेलीही सवर्णांना चालत नव्हती. त्यामुळेच तर अगदी अलीकडेपर्यंत दलित समाजातील अनेकांची नावं दगडू-धोंडू अशी असायची. मात्र आपल्या सिनेमातील दलित पात्रांना महाभारतातील पात्रांची नावं ठेवून मारी सेल्वराजने केवळ साधीसुधी क्रांती केलेली नाही, तर त्याने संस्कृती रक्षकांना सणसणीत हाणली आहे. त्याने आपल्या दलित पात्रांना महाभारतातील नावं ठेवलीत, पण मुद्दामच धर्म, अर्जुन, भीम किंवा कृष्ण अशी नावं न ठेवता कर्ण-दुर्योधन अशी ठेवलीत. कदाचित त्याला पांडवांच्या दांभिकपणावर यातून भाष्य करायचं असावं! बहुधा म्हणूनच कर्णनच्या म्हणजेच सिनेमाचा नायक असलेल्या कर्णाच्या प्रेयसीचं नावही त्याने मुद्दामच द्रौपदी ठेवलं असावं. कारण महाभारतातल्या द्रौपदीने कर्ण सूतपुत्र, म्हणजेच खालच्या जातीचा म्हणून स्वयंवरात त्याला अव्हेरले होते. सेल्वराजने आपल्या सिनेमात कर्णाच्या प्रेयसीचं नाव द्रौपदी ठेवून त्याची खणखणीत भरपाई केली.
ग्रामदेवतेच्या वार्षिक सण-उत्सवात देवतेला दोन-चार पायांचा नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा-परंपरा अद्याप कुठे कुठे टिकून आहेत. असाच एक बळी देण्याचा ग्रामविधी ‘कर्णन’ चित्रपटात आहे. हा ग्रामविधी काय, तर कडय़ाच्या एका टोकावरून काही जणांनी एक मोठा मासा हवेत भिरकावून द्यायचा आणि समोरच्या कडय़ावर उभ्या असलेल्या (खरं तर ग्रामविधीचं आव्हान स्वीकारलेल्या) व्यक्तीने त्याच वेळी उडी मारून हवेतच त्या माशाचे तलवारीने दोन तुकडे करायचे. सिनेमात अगदी सुरुवातीलाच कर्णन हा पराक्रम करतो आणि पराक्रमाचं द्योतक असलेली गावाची पारंपरिक तलवार त्याच्याकडे येते. सिनेमातील या मासा मारण्याच्या ग्रामविधीतील कूट वा प्रतीक सहजासहजी सुटत नाही. कारण आजवर अनेक पशुपक्षी ग्रामविधीत मारलेले प्रत्यक्ष पाहिलेले आहेत, परंतु ग्रामविधी म्हणून मासा मारण्याची पद्धत या सिनेमात प्रथमच पाहायला मिळाली. मात्र बळी म्हणून मासाच का? याचं स्पष्टीकरण या सिनेमात तरी मिळत नाही. खरं तर बळी म्हणून कोंबडा-बोकड-रेडा असा कोणताही प्राणी प्रतीकात्मक पद्धतीने दाखवताच आला असता. मग मासाच का? इथेही मासा हा संस्कृती संघर्षाचाच निदर्शक तर नाही? म्हणजे द्रौपदीच्या स्वयंवरात खाली पाण्यात पाहून वर गोलाकार फिरणाऱ्या मत्स्याचा दृष्टिभेद करायचा होता तेव्हा केवळ सूतपुत्र म्हणून कर्णाला तो अधिकार नाकारण्यात आला होता. त्याचा वचपा म्हणून इथे मासा कापण्याचा विधी होता का?
किंवा कदाचित यापेक्षा वेगळाही अर्थ लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित असू शकतो, तो म्हणजे विष्णूचा पहिला अवतार असलेल्या मत्स्याचा वध. तसं पाहायला गेलं तर विष्णूचे नऊ अवतार म्हणजे धर्मवाद्यांनी सर्वसामान्यांचा केलेला बुद्धिभ्रमच आहे. म्हणजे आपल्या मार्गातील काटे दूर करण्यासाठीच विष्णूने एक प्रकारे हे नऊ अवतार धारण केलेले आहेत आणि त्यातील पहिलाच अवतार हा मत्स्यावतार आहे. आता हा मत्स्यावतार विष्णूने का घेतला, तर म्हणे ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडलेले ज्ञान देणारे वेद घेऊन काही असुर पळाले आणि समुद्रात जाऊन लपले. तेव्हा त्यांना शोधून काढण्यासाठी आणि वेद परत मिळवण्यासाठी विष्णूने मत्स्यावतार धारण केला. नंतर त्या असुरांना ठार मारून विष्णूने ते वेद पुन्हा नेऊन दिले. मत्स्यावताराची ही कथा म्हणजे सरळ सरळ सुर-असुर संस्कृती संघर्ष आहे आणि या मत्स्यावताराचा निषेध म्हणूनच तर सेल्वराजने ग्रामविधीत मासा कापलेला नाही ना! ही एक प्रकारे केलेली प्रतीकात्मक परतफेड आहे.
तेव्हा एकूणच ‘कर्णन’ चित्रपटाकडे केवळ दलित-सवर्ण परिप्रेक्ष्यातून पाहणं म्हणजे त्याच्या व्यापकतेला वेसण घालण्यासारखं आहे. एकीकडे ठळकपणे दलित-सवर्ण लढय़ाची कथा उभी करतानाच हा सिनेमा दुसरीकडे सुर-असुर, अभिजन-बहुजन हा संस्कृती संघर्षही अधोरेखित करतो आणि त्यासाठी परंपरेतील प्रतीकांचीच नेमकी निवड करतो. आजवर अभिजनांनी त्यांच्या सोयीसाठी वापरलेली ही प्रतीकं आता त्यांच्याच विरोधात वापरण्याची वेळ आली आहे!
– [email protected]