आयटी पार्क, शैक्षणिक संस्थांजवळ गांजाविक्री

धुळे येथून गांजातस्करी करून पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी पार्क व शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये गांजाविक्री करणाऱ्या तीनजणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 33 किलो गांजा जप्त करण्यात आला.

सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी (वय 36, रा. म्हाळुंगे, मूळ – चित्रकुट, ता. श्रीरामपूर, उत्तर प्रदेश), अशोक गुलाबचंद पावरा (वय 19), पवन सानू पावरा (वय 19, दोघे रा. मांजणी पाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरामध्ये अमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्याकरिता व अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवेगळी पथके तयार केली. सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड यांचे पथक हिंजवडी-म्हाळुंगे परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निखिल शेटे व मयूर वाडकर यांना तीनजण संशयितरीत्या जात असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडे 16 किलो 104 ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ, 2 मोबाईल व 1 दुचाकी असा 9 लाख 50 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. गुन्हा दाखल करून अधिक तपास केला असता, आरोपींकडे त्यांच्याकडून आणखी 8 लाख 50 हजार रुपये किमतीचा 17 किलो 9 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हा गांजा हिंजवडी येथील आयटी पार्क व शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, ज्ञानेश्वर दळवी, प्रदीप शेलार, किशोर परदेशी, शिल्पा कांबळे, निखिल वर्षे, राजेंद्र बांबळे, गणेश कर्पे, सदानंद रुद्राक्षे, रणधीर माने, कपिलेश इगवे, गोविंद डोके, पांडुरंग फुंदे, नागेश माळी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

” हिंजवडी आयटी पार्क व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात गांजा बाळगणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी यापूर्वी कारवाया केल्या आहेत. मात्र, त्यांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या टोळीच्या मुळाशी जाण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने तपास केला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना जेरबंद केले. आरोपींनी धुळे आणि मध्य प्रदेश सीमाभागातून हा गांजा आणला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपी सामील असू शकतात, यादृष्टीने पथकामार्फत तपास केला जाणार आहे. शहरात अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रकार सुरू असल्याबाबत कोणाला माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
– संतोष पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथक)