>> वर्षा चोपडे
जगातील सर्वात प्रगत शास्त्रीय नृत्यनाट्यांपैकी एक मानाचे नृत्य म्हणजे कथकली. कथा-कहाणी मांडणाऱ्या कथकली केरळच्या या नृत्यशैलीला मंदिराच्या वार्षिक उत्सवात, धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. नृत्य देहास परमोच्च आनंद देते. लहान मूल आनंदाने नाचू लागते तेव्हा तो कौतुकाचा सोहळा ठरतो. नृत्य कुठे करतो आणि त्याचा उद्देश काय आहे हे नेहमीच महत्त्वाचे होते. नृत्य हा नेहमीच मानवी संस्कृतीचा, संस्कारांचा आणि उत्सवांचा भाग राहिला आहे. मनोरंजन हा नृत्याचा मुख्य उद्देश असला तरी मानसिक आनंद देण्याची अफाट शक्ती नृत्यात आहे. विविध राज्यांत आणि विविध देशांत नृत्याच्या लयी आणि पद्धती निरनिराळ्या आहेत. केरळच्या प्रसिद्ध कथकली नृत्याचे मंदिराच्या वार्षिक उत्सवात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कथकली म्हणजे कथा, कथा-कहाणी. कथकली नृत्याबाबत असे म्हणतात की, सुरुवातीला एक अडाणी, असंस्कृत फॉर्म म्हणून जे सुरू झाले ते हळूहळू उत्कृष्ट स्वरूप, अत्याधुनिक हालचाली आणि पूरक ऑडिओ सपोर्ट मिळाल्यामुळे आज जगातील सर्वात प्रगत शास्त्रीय नृत्यनाट्यांपैकी एक मानाचे नृत्य झाले.
आकर्षक पारंपरिक मेकअप आणि विशेष कपडे या नृत्याची मोहकता वाढवतात. कथकली नृत्याची सुरुवात सर्वप्रथम 17 व्या शतकात सुरू झाली आणि मूलत हे नृत्य केवळ पुरुषांद्वारे सादर केले गेले. पारंपरिकपणे हे नृत्य संध्याकाळी सादर केले जाते. ज्यामध्ये महाभारत आणि रामायण या महाकाव्यांवर आधारित गीत- संगीताचा समावेश असतो. कृष्णनट्टम हा नृत्य-नाटक कला प्रकार कालिकतचा शासक (1585-1658) श्री मानववेदन राजा याच्या काळात विकसित झाला. हिंदू देवता कृष्णाचे जीवन या नृत्याद्वारे प्रस्तुत केले जाते. कोट्टरक्करा येथील राजा कोट्टरक्करा थंपुरणने केरळच्याच झामोरिनला राजाला कृष्णनट्टम कलाकारांची टीम एका उत्सवासाठी पाठवण्याची विनंती केली, पण झामोरिनने उपहासाने ती विनंती नाकारली. हा कोट्टरक्करा राजाला आपला भयंकर अपमान वाटला. कोट्टरक्करा राजाने गणपती मंदिरात जाऊन यातून मार्ग काढण्याची विनंती केली. गणेशाला प्रार्थना केली. त्यानंतर त्याच्या मनात एक नवीन कलाकृती तयार करण्याची योजना निर्माण झाली. तो देवळाच्या तळ्याच्या काठी गेला व पाण्याकडे बघत बसला. तिथं त्याला लाटांचे वेगवेगळे आकार चकचकीत रंग संयोजनात दिसले. या अनुभवातून थंपुरणने कथकलीच्या पोशाखांची रचना केली. मंदिराजवळील वटवृक्षाखाली बसून त्याने रामनट्टम लिहिले. अशा प्रकारे झामोरिनच्या व्यंगाला प्रत्युत्तर म्हणून थंपुरणने रामनट्टम या नवीन कला प्रकाराची निर्मिती केली. हा कला प्रकार पुढे कथकलीमध्ये विकसित झाला. नाट्यशास्त्राचे श्रेय भरत ऋषींना दिले जाते. कथकलीचे घटक आणि पैलू नाट्यशास्त्रासारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथातून घेतले आहेत. गणपतीच्या आशीर्वादाने कथकली नृत्य प्रसिद्ध झाले असा विश्वास कोट्टरकराच्या आसपासच्या लोकांचा होता. रामनट्टमचे पहिले स्टेज गणेशासमोर करण्यात आले.
कथकली कृष्णनट्टम, कुडिअट्टम (केरळमध्ये अस्तित्वात असलेले एक शास्त्रीय संस्कृत नाटक) आणि अष्टपदियट्टम (गीतगोविंदम नावाच्या 12व्या शतकातील संगीत नाटकाचे रूपांतर) यांच्याशीही बरेच साम्य सामाईक करते. यात मुदियेट्टू, थिय्याट्टू, थेय्याम आणि पदयानी यांसारख्या पारंपरिक आणि कर्मकांडाच्या कला प्रकारातील इतर अनेक घटकांचा समावेश आहे. शिवाय पोरात्तुनाटकमसारख्या लोककलांचा अल्प भाग आहे. कलरीप्पयट्टूच्या मार्शल आर्टने कथकलीच्या देहबोलीवर प्रभाव टाकला आहे. मल्याळम, स्थानिक भाषेच्या (जरी संस्कृत आणि मल्याळमचे मिश्रण म्हणून मणिप्रवलम म्हटले जाते) वापरामुळेदेखील कथकलीचे साहित्य सरासरी प्रेक्षकांसाठी अधिक पारदर्शक होण्यास मदत झाली आहे.
प्रगत कोरिओग्राफी, याशिवाय रंगवलेले चेहरे आणि विस्तृत वेशभूषा असलेली पात्रे – मुख्यत्वे हिंदू महाकाव्यांतील कथा कथकली नृत्याद्वारे पारंपरिकपणे मंदिरे आणि राजवाडय़ांमध्ये तर सादर केले जातेच, परंतु आता हे नृत्य केरळच्या भातशेती कापणी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच पर्यटकांसाठी मोठमोठ्या हॉटेलमध्येही सादर केले जाते. मोहिनीअट्टम, ओट्टमथुलालकोलपाली, तिरुवतिराकली, कुडियाट्टम हे केरळचे इतर नृत्य प्रकार असले तरी कथकली केरळचे प्रमुख नृत्य असून जनमानसात ते अत्यंत प्रसिद्ध पावले आहे.
– [email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)