रंगभूमी- सादरीकरणातील सौंदर्य

>> अभिराम भडकमकर

जगातल्या प्रत्येक सादरीकरणाकडे एक प्रकार म्हणून पाहिले पाहिजे. अमुक एक प्रकार म्हणजेच उत्तम, अमुक म्हणजे दुय्यम. हा प्रकार म्हणजे गौरवण्याचा, तो म्हणजे टीकाटवाळी करण्याचा. अशा पद्धतीची लघुदृष्टी कोणत्याही कलाप्रकारासाठी, सौंदर्यदृष्टीसाठी घातकच ठरते.

गणेशोत्सव हा केवळ मराठी मनाचाच नव्हे, तर आता अवघ्या हिंदुस्थानी जनमानसाचा एक महत्त्वाचा सण बनून राहिला आहे. गणपतीच काय, पण कुठलाही उत्सव जवळ आला की, फेसबुकवर ठरावीक प्रकारच्या पोस्ट पडू लागतात. ज्यामध्ये एकूणच आता हे सगळे सणवार बंद झाले पाहिजेत असा एक सूर असतो. म्हणजे कुणाला पर्यावरणाची हानी दिसत असते, कुणाला गोंगाट, कुणाला ट्रफिक जाम, कुणाला पाण्याची नासाडी वगैरे! यामध्ये तथ्य नाही अशातलाही भाग नसतो.

हे बदल व्हायलाच हवेत. हा सामाजिक व सांस्कृतिक उत्सव आहे, धांगडधिंग्याची स्पर्धा नव्हे! सौंदर्यदृष्टी दिसायला हवी. आर्थिक उलाढाल व्हावी, उधळपट्टी नको.

पण केवळ विरोधाऐवजी माझा सहभाग त्याच्यामध्ये कसा असेल आणि मी त्यात बदल करण्यासाठी काय करेन? याचा विचार न करता ‘ते सारे बंद करून टाका’ असा एक सूर आढळतो. तोही नको. कारण अनेक, असंख्य गणपतींच्या मांडवांमध्ये आजही वैचारिक, सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रम होताना दिसतात. सामाजिक भान लक्षात घेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. अनेक सामाजिक संस्थांसाठी त्यातून पैसे दिले जातात. ही मंडळी ‘बंद करा!’ असं म्हणत बसत नाहीत.

ती प्रत्यक्षात बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. आणखी एक मजेदार सूर दिसतो तो म्हणजे कुत्सितपणाचा. जो नाटक या कला प्रकाराशी संबंधित आहे म्हणून लिहितो आहे.

परवाच एकाने गणपतीतल्या जिवंत देखाव्यांवर तोंडसुख घेतलं. काय तर म्हणे त्याला ते सगळं बालिश वाटलं. गणपतीच्या जिवंत देखाव्यांमध्ये माणसे हावभाव करतात आणि संवाद मात्र रेकॉर्ड केलेले असतात. यात कसली आलीय सौंदर्यदृष्टी? हे कसलं फालतू आहे वगैरे वगैरे… असा सूर त्यांनी लावला होता.

खरं तर अशा पद्धतीचे देखावे आपल्याला ख्रिसमसला दिसतात, मोहरमच्या काळामध्ये अंगावर पट्टे मागून वाघ बनणारे लोक आपल्याला दिसतात. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीतलाच तो एक भाग आहे. कुणी ते अतिशय दर्जेदार आणि सुबकपणानं करतं, तर काहींच्या सादरीकरणांमध्ये नवखेपणा, बालिशपणाही जाणवतो, परंतु केवळ गणपतीचा उत्सव आहे. त्यामुळे एक कुत्सित सूर लावलाच पाहिजे अशा प्रचंड भावनेने ती टिंगल केलेली दिसून येत होती आणि मग ट्रफिक जाम वगैरे वगैरे इतर गोष्टी होत्याच.

हा जो सूर आहे त्याच्या पाठीमागे आपली रंगभूमीकडे बघण्याची दृष्टी कारणीभूत आहे असं मला वाटतं. नाटय़शास्त्रामध्ये नाटक कसं असावं याबद्दल लिहिलं आहे, परंतु नाटक असंच असलं पाहिजे असा हट्टाग्रह त्यामध्ये नाही. मात्र आजकाल काही लोक नाटक कसं असलं पाहिजे, नाटकात काय असलं पाहिजे याबद्दल अत्यंत दुराग्रही झालेले दिसतात.

अशाच दुराग्रहातून ‘महानाटय़’ या नावाने संबोधल्या जाणाऱया एका नाटय़ प्रयोगाला आपल्याकडच्या एका समीक्षकांनी ‘सर्कस’ म्हटलं होतं. त्याचीही मला आठवण आली. जगभर नाटकात प्राणी वापरले जातात हे बांद्रा ते शिवाजी मंदिर इतकाच वावर असलेल्याना कसं कळणार म्हणा, असं त्या वेळी बोललं गेलं होतं.

पण मला त्यामुळे एक जुना किस्सा आठवला. एनएसडीत असताना बी. व्ही. कारंत यांच्याबरोबर आम्ही मुलं कर्नाटकात एक नाटक पहायला गेलो होतो. तंबू थिएटरमधलं म्हणजे टुरिंग थिएटरचं नाटक होतं. संत अक्कमहादेवींच्या जीवनावर हे नाटक होतं. त्यात कार्डबोर्डचा हत्ती आणला गेला. वर लावलेल्या प्लॅस्टिक पाइप्सच्या भोकांमधून पाऊस पाडला गेला. आम्ही खूप हसलो. टिंगलही केली.

रात्री जेवताना कारंतजी म्हणाले, “हंसना नहीं, बात कहने का अपना अपना तरीका होता है’’ आणि त्या क्षणी जाणवलं की, प्रत्येक शैली, प्रत्येक सादरीकरण हे ‘बात कहने का अपना अपना तरीका होता है’.

लहानपणी कोल्हापुरात आणि आजही अनेक ठिकाणी गणपतीला, ख्रिसमसला होणारे देखावे हे अशाच स्वरूपाचे असतात.

जगभरातही अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रयोग होतात. गुणवत्ता कमी अधिक असेल, पण प्रत्येक सादरीकरण हा ‘बात कहने का अपना अपना तरीका’ असं म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे हे कारंतजींनी त्या दिवशी ठामपणे आमच्या मनामध्ये घुसवलं होतं.

मग नाटकाकडे आणि प्रत्येक सादरीकरणाकडे पाहण्याची आमची दृष्टी बदलली. प्रत्येक काळात माणसाने सादरीकरणाची एक नवीन पद्धत, नवीन शैली शोधून काढली आणि त्या पद्धतीने त्यानं व्यक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याने त्यासाठी केलेला आहे.

ग्रीक शोकनाटय़ांमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये नटांचे संवाद ऐकू जाणार नाहीत हे लक्षात घेऊन लाऊड स्पीकर वगैरे अशा पद्धतीची उपकरणे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी कोरसचा वापर केला. ज्यात आधी पन्नास नट असत. एस्केलिसने ते बारावर आणले आणि सोफोक्लिसने ते पंधरावर आणून स्थिरावले.

म्हणजे ठरावीक संख्येने कोरसमधले कलावंत नाटकातले संवाद एकाच सुरात म्हणत आणि सर्वांच्या एकत्रित आवाजामुळे त्या आवाजाचा व्हॉल्यूम वाढत असे आणि शेवटपर्यंत ते ऐकू जाई. लाऊड स्पीकर आल्यानंतर कोरसचा उपयोग उरला नाही. या जिवंत देखाव्यांमध्ये साधारणत असाच प्रकार असतो किंवा महानाटय़ांमध्ये आधीच ध्वनिमुद्रित करून ठेवलेले संवाद हे लोकांपर्यंत चांगल्या ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे पोहोचवले जातात आणि कलावंत केवळ हालचाली करतात.

हे योग्य की अयोग्य हा मुद्दाच नाही. सादरीकरणाचा हा एक प्रकार आहे आणि जगातल्या प्रत्येक नाटकाच्या सादरीकरणाकडे एक प्रकार म्हणून पाहिले पाहिजे. अमुक एक प्रकार म्हणजेच उत्तम, अमुक म्हणजे दुय्यम. हा प्रकार म्हणजे गौरवण्याचा, तो म्हणजे टीकाटवाळी करण्याचा. अशा पद्धतीची लघुदृष्टी आमच्यामध्ये निर्माण झाली नाही ती बी. व्ही. कारंत यांच्यासारख्या शिक्षकांमुळेच.

अशी पोस्ट टाकणारे किंवा असे समीक्षण लिहिणारे लोक मुळातच नाटकाच्या विविध शैली, सादरीकरणाच्या विविध परंपरा यांच्या शक्यताच समजून घेऊ शकत नाहीत. ती त्यांच्या आकलन शक्तीची उणीव असते, त्याला आपण काय करणार! पण असे जिवंत देखावेही मी अत्यंत मनापासून पाहतो. त्यामध्ये काय चांगलं आहे, काय उणिवा आहेत याचाही विचार करतो आणि मनमुराद त्याचा आनंद घेतो.

कारण मी ‘नाटक म्हणजे असंच असतं’ आणि ‘फक्त असंच असलं पाहिजे’ या दुराग्रहातून बाहेर पडलो आहे. म्हणून वाटतं, बरं झालं कारंतजी आयुष्यात आले अन्यथा आपणही लघुदृष्टीचेच होऊन बसलो असतो. नाटक असंच असलं पाहिजे, असा दुराग्रह धरून बसलो असतो.

z [email protected]
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)