>> गुरुनाथ तेंडुलकर
मागच्या म्हणजेच पंधराव्या लेखात आपण पाहिलं की, अर्जुनाने कुरुक्षेत्रावर ऐन युद्धाला सुरुवात होण्याच्या क्षणीच कच खाल्ली आणि भगवान श्रीकृष्णाला आपला युद्ध न करण्याचा निर्णय सांगून मोकळा झाला आणि त्याचबरोबर आपला निर्णय कसा योग्य आणि धर्मसंमत आहे हेदेखील पुनः पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं. त्याचबरोबर अर्जुन असंही म्हणाला की, “मी तुम्हाला शरण आलो आहे. तुमचा शिष्य झालो आहे. मी काय करू ते सांगा.’’
अर्जुन अत्यंत संभ्रमित झाला आहे हे यावरून स्पष्टच दिसून येतं. त्याची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांना हसू फुटलं.
तमुवाच हृषीकेश प्रहसन्निव भारत
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वच ।। 10 ।।
भावार्थ ः हे धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करीत असलेल्या त्या अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले…
।। श्री भगवान उवाच।।
भगवद्गीतेचं हे एक वैशिष्टय़ म्हणजे यात प्रामुख्याने श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे, पण भगवद्गीतेत व्यासांनी श्रीकृष्णाच्या वचनांचा उल्लेख करण्याआधी कुठेही ‘श्रीकृष्ण उवाच’ असं न म्हणता ‘श्री भगवान उवाच’ असं म्हटलं आहे. या इथे अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश करणारा श्रीकृष्ण हा केवळ एक व्यक्ती म्हणून बोलत नव्हता, तर त्या वेळी तो साक्षात परमेश्वर म्हणूनच बोलत होता. म्हणून ‘श्री भगवान उवाच’. श्रीकृष्णाचं हे भगवंतरूप म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला पुढे पुढे उलगडत जाईलच, पण तूर्तास एकच सांगू इच्छितो की, इथे श्रीकृष्ण म्हणजे एक मर्त्य मानव व्यक्ती म्हणून बोलत नाही, तर सर्व चराचराला व्यापणारा आणि अनादी कालापासून अनंत कालापर्यंत अक्षय असणारा परमात्मा म्हणून बोलतोय.
…आणि म्हणूनच भगवद्गीता हा केवळ श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद न राहता प्रत्यक्ष परमेश्वराने मानवरूपात येऊन गहनगूढ शास्त्राची केलेली उकल आणि मानवी समस्या निवारणासाठी सांगितलेले उपाय असं भगवद्गीतेचं स्वरूप आहे.
अनेक जण सांगतात की, “आम्ही भगवद्गीता वाचली नाही. कारण तो खूप मोठा आणि जाडजूड ग्रंथ आहे.’’
त्यांना मी सांगू इच्छितो की, भगवद्गीता हा ग्रंथ काही फारसा जाडजूड आणि मोठा ग्रंथ अजिबात नाही. यात केवळ सातशेच श्लोक आहेत. एकूण शब्दसंख्या केवळ 9839 म्हणजे साधारण आकाराच्या पुस्तकाची जेमतेम पन्नास पानं भरतील एवढंच पुस्तक. मुळात संस्कृतमधे असलेल्या भगवद्गीतेवर अनेक भाषांतून अनेक भाष्यं उपलब्ध आहेत. कोणतंही एक भाष्य घेऊन वाचनाला आरंभ केला तर हळूहळू ग्रंथ उलगडत जाईल. आयुष्य हळूहळू उजळत जाईल. असो.
मी युद्ध करणार नाही, असं म्हणणाऱया अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले ते आपण पाहू…
श्री भगवान उवाच
अशोच्यान् अन्वशोच च त्वम् प्रज्ञावादान् च भाषसे
गतासून् अगतासून् च न अनुशोचन्ति पण्डिताः ।। 11 ।।
भावार्थ ः ज्या गोष्टीचा शोक करू नये अशा गोष्टीचा तू शोक करतो आहेस आणि वर विद्वत्तेच्या ( पांडित्याच्या ) गोष्टी बोलत आहेस. खरं तर ज्यांचे प्राण अगोदरच निघून गेलेले आहेत (म्हणजेच जे मृत झाले आहेत) किंवा ज्यांचे प्राण अद्याप निघून गेलेले नाहीत (जे अद्याप जिवंत आहेत) अशा माणसांबद्दल पंडित कधीही शोक करीत नाहीत. इथे भगवंतांनी शहाण्या माणसांसाठी ‘पंडित’ हा शब्द वापरला आहे. पंडित म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात जाणून घेऊ या.
सत् काय आणि असत् काय? म्हणजेच योग्य काय आणि अयोग्य काय? याचा निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या बुद्धीला पण्डा बुद्धी असं म्हणतात. ही पण्डा बुद्धी ज्या व्यक्तींची पूर्ण विकसित झालेली असते अशा व्यक्तींना पंडित असं म्हटलं जातं.
अर्जुन पांडित्याच्या गप्पा मारतोय. युद्धापासून पळून जाण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधतोय.
“मी माझ्या आप्तेष्टांना कसं मारू? गुरुजनांना आणि वडीलधाऱयांना कसं मारू?’’ असे प्रश्न विचारतोय.
तो म्हणतोय की, “युद्धामुळे केवळ नुकसानच होतं. अनेक पुरुष मरतात. त्यांच्या स्त्रिया विधवा होतात. मुलं अनाथ होतात. निरपराध लोक भरडले जातात.’’ अशा प्रकारचं अहिंसेचं बेगडी तत्त्वज्ञान पुढे करून स्वतचा बचाव करू पहातोय. वास्तवात तो स्वत भ्यालाय. कौरवांची बलाढय़ सेना पाहून त्यालादेखील मनातून धडकी भरलीच आहे. “मी यांना कसा मारू?’’ असं म्हणणाऱया अर्जुनाला या युद्धात “आपणदेखील मरू शकतो’’ याची जाणीव झाली आहे, पण तसं स्पष्ट सांगणं त्याला जमत नाही. म्हणून तो वेगवेगळी कारणं सांगून भगवान श्रीकृष्णाला युद्धभूमीपासून आपला रथ दूर न्यायला सांगतोय, पण…
पण अर्जुनाचा रथ कुठं न्यायचा हे आता सर्वस्वी भगवंतांच्या हातात आहे. ते त्यांना योग्य तेच अर्जुनाकडून करवून घेणार आहेत, पण त्यासाठी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्याला समजेल अशा सोप्या शब्दांत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं भरकटलेलं मन ताळ्यावर आणणार आहेत.
त्यासाठी ते काय काय उपाययोजना करतात आणि कोणकोणत्या प्रकारे अर्जुनाला समजावतात हे आपण पुढे पुढे पाहणारच आहोत.
या लेखाचा शेवट करताना एवढंच सांगतो की, अर्जुन मनोरुग्ण झाला आहे, भरकटला आहे. त्याला नेमकं काय करावं हे उमगत नाही. त्याच्या मनात एक आणि बोलण्यात दुसरंच आहे. त्याचं चित्त थाऱयावर नसल्यामुळे तो या परिस्थितीत युद्ध करूच शकणार नाही. त्याची मनोवस्था आणि त्यामुळे शरीरावस्था दोन्ही कमकुवत झाल्या आहेत. अशा वेळी त्याच्यावर जबरदस्ती केली तर तो अधिकच बिथरेल. त्यामुळे भगवंतांना अपेक्षित तो परिणाम साधला जाणार नाही. ज्या कारणासाठी हे युद्ध होऊ घातलं आहे ते कारण कदापि साध्य होणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला टप्प्याटप्प्यानं समजावून, पायरी पायरीने योग्य मार्ग दाखवताहेत.
आपणही हा मार्ग समजून घेऊ या आणि आपलं आयुष्य कृतार्थ करू या.
।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।