वयाच्या 75 व्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील. त्याआधी ते आपले सर्व हट्ट पुरवून घेत आहेत. ‘एक देश एक निवडणूक’ हा त्यातलाच एक हट्ट. त्या हट्टासाठी देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. मोदींनी जाहीर केलेल्या सर्व योजना कोसळून पडल्या आहेत. ‘वन इलेक्शन’ योजनाही कोसळून पडेल.
वेताळ ज्याप्रमाणे आपला हट्ट पूर्ण करतो, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ हा आपला हट्ट पूर्ण करण्याचे ठरवले आहे. मोदी यांनी 17 तारखेस वयाची 74 वर्षे पूर्ण केली. मोदी हे त्यांनीच तयार केलेल्या शब्दास जागले तर वयाच्या 75 व्या वर्षी त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागेल. 75 वर्षांनंतर कोणी सत्तेच्या पदावर राहू नये असा नियम मोदी यांनी केला. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन असे अनेक नेते मार्गदर्शक मंडळात जाऊन बसले. एक वर्षाने पंतप्रधान मोदी यांनाही जावे लागेल व त्याआधी मोदी यांना ऐतिहासिक निर्णय घेऊन इतिहासात नाव कोरायचे आहे. मोदी यांनी वर्षभरानंतर काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण आपल्या नावावर इतिहास लिहिला जावा यासाठी त्यांनी सुरू केलेल्या खटपटी देशाला खड्ड्यात घालणाऱ्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांत कोणतेच भरीव काम केले नाही. त्यांनी उत्सव आणि सोहळे साजरे केले. त्यांनी जगभ्रमण केले. मोदी यांनी सरकारी तिजोरी रिकामी केली. त्या बदल्यात देशाला काय मिळाले? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प महाशयांचा प्रचार करण्यासाठी मोदी आता अमेरिकेस निघाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीच वॉशिंग्टन येथे जाहीर केले आहे, ‘मोदी 21-22 सप्टेंबरला अमेरिकेत येत आहेत. त्यांची व माझी भेट होईल.’ ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी अमेरिकेत जात आहेत. बाकी ‘क्वॉड’ नेत्यांचे शिखर संमेलन वगैरे बहाणा आहे. एक देश, एक निवडणूक हा मोदींचा हट्ट आहे. ज्या अमेरिकेत ट्रम्प यांच्या प्रचारासाठी ते चालले आहेत त्या अमेरिकेत एक देश, एक निवडणूक वगैरे प्रकार नाही. मोदी यांनी अमेरिकेत जाऊन या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे.
कोसळलेल्या योजना
मोदी यांनी देशात सुरू केलेल्या सर्वच योजना कोसळून पडल्या आहेत. त्यामुळे एक देश, एक निवडणूक योजनाही वाऱ्यावरच उडून जाईल.
मोदी हे एखादी योजना घेऊन येतात व ती योजना कोसळून पडते.
मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केली. हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे भ्रष्टाचार व दहशतवाद बंद होईल, असे ते म्हणाले. नोटाबंदीची योजना व घोषणा अपयशी ठरली. अर्थव्यवहार कोलमडून पडले.
कोरोना काळात थाळ्या व घंटा वाजवून ब्लॅकआऊट करा, कोरोना पळून जाईल, अशी योजना त्यांनी काढली. कोरोना गेला नाही. शेकडो प्रेते गंगेत सोडावी लागली.
मोदी पाकव्याप्त कश्मीर भारतास जोडून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करणार होते. ते घडलेच नाही. उलट लडाख, अरुणाचल प्रदेशात घुसून चीनने देशाचे लचके तोडले.
मोदी यांनी राममंदिर, नवी संसद उभी केली. या वास्तू गळू लागल्या आहेत.
मोदी यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिराचे कॉरिडोर उभे केले. एका वादळात त्यातील देवाच्या मूर्ती कोसळल्या. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातील मोदींच्या हस्ते उभा केलेला शिवरायांचा पुतळाही कोसळला.
मोदी यांनी परदेशातील काळा पैसा भारतात परत आणून सर्व नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकण्याची योजना केली. ती अमलात आलीच नाही.
मोदी यांनी भ्रष्टाचाराचा व भ्रष्ट व्यक्तीचा समूळ नायनाट करण्याचा विडा उचलला. प्रत्यक्षात मोदी यांनी त्यांच्या पक्षात सर्व बाहेरचे भ्रष्टाचारी जमा केले व त्या भ्रष्ट पैशांवर ते स्वतःचे राजकारण करीत आहेत.
आपण असामान्य व्यक्ती असून देवाचे अवतार असल्याची ‘योजना’ जाहीर केली, पण त्यांचे देवत्व झूठ आहे हे जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले.
मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. हातात झाडू घेऊन साफसफाईचे नाटक केले. आज भारत सर्वात जास्त अस्वच्छ व कचरेबाज देश म्हणून ओळखला जातो.
स्वावलंबी व आत्मनिर्भर भारताची संकल्पना मोदी यांनी मांडली, पण देशातील 90 कोटी लोकांना मोदी हे माणशी 10 किलो धान्य फुकट देऊन आळशी व गुलाम बनवत आहेत.
भारत कुणापुढे झुकणार नाही असे मोदी वारंवार म्हणत होते, पण चीनच्या आक्रमणाविरुद्ध मोदी हे तोंडास बूच लावून बसले आहेत. मोदी हे युक्रेनला जाताच ‘आपण युक्रेनला का गेलो व युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांशी काय चर्चा झाली’ याचा खुलासा करण्यासाठी मोदी यांनी त्यांचा दूत रशियात पुतीन यांना भेटण्यासाठी पाठवला. हे काही स्वावलंबी व सार्वभौम देशाचे लक्षण नाही. विश्वगुरू हा एक फुसका बार असल्याचे यातून सिद्ध झाले.
पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या सर्व योजना व घोषणा या फुसक्या व फसव्याच ठरल्या. एक देश, एक निवडणूक योजनेची अवस्था वेगळी होणार नाही. 370 कलम हटवल्याचे श्रेय मोदी यांनी घेतले. 370 कलम हटवताच कश्मीरात सर्व काही सुरळीत होईल, कश्मिरी पंडित स्वतःच्या घरी जाऊ शकतील, कश्मीरात उद्योग येतील, रोजगार वाढेल, दहशतवाद संपेल, असे सांगितले गेले. यापैकी काहीच झाले नाही. एक देश, एक निवडणूक योजना अशीच फसवी आहे.
नो इलेक्शन!
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांना भविष्यात निवडणुकाच घ्यायच्या नाहीत. एक देश, एकच उद्योगपती ही त्यांची मूळ योजना. ‘नेशन-इलेक्शन’ हे दुय्यम आहे. जे सरकार मणिपुरात पोहोचले नाही ते सरकार सर्व देशात एकाच वेळी निवडणुका घेणार. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासारख्या राज्यांत सात-आठ टप्प्यांत निवडणुका घेणाऱया अकार्यक्षम व पक्षपाती निवडणूक आयोगाच्या भरवशावर देशात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याची योजना हा फार्स ठरेल. चार राज्यांतील निवडणुका एकत्र घेऊ न शकणाऱ्या व मुंबईसह महाराष्ट्रातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुका तीन वर्षे न घेणाऱयांना एक देश, एक निवडणुकीचा डंका वाजवायचा आहे. मोदी हे पुढच्या वर्षी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्त होतील. कारण ही योजना त्यांनीच आणली. त्यामुळे नवा पंतप्रधान एकत्र निवडणूक योजनेचा निर्णय घेईल, तोपर्यंत एकत्र निवडणुकांचे ढोल वाजवत रहा!
वेताळाने हट्ट पूर्ण केला. आपले पंतप्रधानही त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करून घेत आहेत. एक वर्ष सहन करावे लागेल. करू या!
twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]