संपूर्ण न्यायपालिकेला दोषी ठरवता येणार नाही; सीबीआयला चपराक
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करत आहे. मात्र या प्रकरणी दाखल याचिकांवरील सुनावणी पश्चिम बंगालमधील न्यायालयांमध्ये न घेता राज्याबाहेर घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली. तसेच कशाच्या आधारावर पश्चिम बंगालमधील न्यायपालिकांमध्ये शत्रुत्वाचे वातावरण आहे, असे म्हणता. संपूर्ण पश्चिम बंगालमध्येच शत्रुत्वाचे वातावरण आहे, असे तुम्ही दाखवत आहात का, अशी प्रश्नांची सरबत्ती करत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चांगलेच फैलावर घेतले.
बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराला अटक
भाजप आमदार एन. मुनीरथना यांना शुक्रवारी बलात्कार, लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकीच्या गुह्याप्रकरणी अटक करण्यात आली. काग्गलीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रिसॉर्टमध्ये मुनीरथना यांनी अत्याचार केल्याचा आरोप एका 40 वर्षीय महिलेने केला होता. तिच्या तक्रारीनंतर मुनीरथनासह इतर सहा जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक
सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे प्रक्षेपण करणाऱ्या यूट्यूब चॅनलवर शुक्रवारी दुपारी अमेरिकेतील एका क्रिप्टोकरन्सी सेवा कंपनीची जाहिरात दिसू लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. काहीजणांना या चॅनेलवर क्लिक केल्यावर थेट दुसरेच यूट्यूब चॅनल सुरू होत असल्याचा अनुभव आला. यामुळे सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनल हॅक झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलकाता प्रकरणाची सुनावणी या चॅनेलवरून प्रक्षेपित होणार आहे.
मणिपूरच्या मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाचे अपहरण
मणिपूरचे ग्राहक व्यवहार मंत्री एल. सुसिंद्रो यांचे स्वीय सहाय्यक एस. सोमोरेंद्रा यांचे इंफाळ पूर्व जिह्यातील त्यांच्या निवासस्थानाजवळून अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी अपहरण केले. अपहरणामागील हेतू अद्याप स्पष्ट नसून अपहरणाची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी रात्री सशस्त्र हल्लेखोरांनी बिष्णुपूर जिह्यातील माजी मुख्य सचिव ओइनम नबकिशोर यांच्या निवासस्थानावर गोळीबाराच्या पाच फैरी झाडल्या होत्या.