लेबेनॉनमधून कारवाया करणाऱ्या हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांविरुद्ध इस्रायलने गुरुवारपासून जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. शुक्रवारी बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या सशस्त्र विभागाचा प्रमुख असलेला कट्टर दहशतवादी आणि वरिष्ठ अधिकारी इब्राहिम अकीलसह 12 जण मारले गेले.
लेबनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकी आणि नंतर सौर उर्जा उपकरणांमध्ये एकापाठोपाठ स्फोट झाल्यानंतर इस्रायलने गुरुवारी रात्री उशिरा दक्षिण लेबनॉनमध्ये तब्बल 70 हवाई हल्ले केले. त्यानंतर हिजबुल्लाहने बदला म्हणून लेबनॉन सीमेजवळ 140 कात्युश्या रॉकेट्स डागत इस्रायलचे अनेक हवाई तळ आणि लष्करी तुकड्यांच्या मुख्यालयांना लक्ष्य केले.
इस्रायलच्या या दाव्याला अद्याप हिजबुल्लाहने अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. मात्र, बेरूतच्या दक्षिणेकडील दहिया उपनगरात इस्रायली हल्ल्यात किमान नऊ लोक ठार आणि सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात भुईसपाट झालेल्या दोन इमारतींपैकी एका इमारतीत अकील होता, असे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या एलिट रॅडवान फोर्सचे इतरही काही प्रमुख दहशतवादी मारले गेल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे.
इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या – हिजबुल्लाह प्रमुख
पेजर आणि वॉकीटॉकी बॉम्बस्फोटानंतर हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह यांनी पहिले भाषण केले. भाषणानंतरही इस्रायली सैन्याने रात्री उशिरा लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले केले. नसराल्लाह यांनी आपल्या भाषणात स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. असे हल्ले करून इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे हिजबुल्लाह प्रमुख म्हणाले. हे हत्याकांड म्हणजे लेबनॉनविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धाची सुरुवात आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
लेबनॉनही हल्ल्याच्या तयारीत
इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्ध भडकल्यानंतर आता त्यात लेबनॉननेही उडी घेतली आहे. एकीकडे लेबनॉनही इस्रायलवर जोरदार हल्ल्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे हिजबुल्लाहचेही मोठे आव्हान इस्रायलसमोर आहे. त्यामुळे इस्रायलला हिजबुल्लाह आणि लेबनॉन अशा दोन आघाड्यांवर लढावे लागणार आहे.
इराकी हिजबुल्लाहचा कमांडर ठार
इराकी हेजबुल्लाह ब्रिगेडचा कमांडर कटैब हेजबुल्लाह हा गुरुवारी सकाळी ड्रोन हल्ल्यात मारला गेला. हा ड्रोन हल्ला इस्रायलने केल्याचा दावा इराकी हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने केला आहे. दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. कटैब कारमधून जात असताना हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर काही क्षणात कारने पेट घेतला.
हिजबुल्लाहचे उत्तर इस्रायलवर 17 हवाई हल्ले
लेबनॉनमधील स्फोटांनंतर हिजबुल्लाहने गुरुवारी रात्रीही उत्तर उस्रायलवर 17 हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये त्यांनी इस्रायली लष्करी तळ आणि बॅरेक्सला लक्ष्य केल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिकही ठार झाले. दरम्यान, लेबनॉनमधील स्फोटांनंतर हिजबुल्लाहचे प्रमुख नसराल्लाह भाषण देत होते तेव्हा बैरुतच्या आकाशात तीन इस्रायली लढाऊ विमाने उडत होती. आता हे युद्ध नवीन टप्प्यावर पोहोचल्याचे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी म्हटले आहे. इस्रायलने गाझापासून उत्तर इस्रायलमधील लेबनॉनच्या सीमेवर आपले बरेच सैनिक तैनात केले होते.