कबड्डीप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या ‘प्रो कबड्डी लीग’च्या 11 व्या हंगामाची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे होत आहे. या हंगामासाठी यू मुंबा संघाने तयारी सुरू केली असून अहमदाबादमध्ये 40 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी एकूण 21 खेळाडूंची फळी अहमदाबादेत दाखल झाली आहे. मुख्य प्रशिक्षक गुलामरझा मझानदारानी आणि सहाय्यक प्रशिक्षक अनिल चप्राना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे.
दबंग दिल्लीविरुद्ध सराव सामना खेळून यू मुंबा शिबिराची सुरुवात करणार आहे. मी या नवीन संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे. गेल्या हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. आम्हाला कशावर काम करण्याची आवश्यकता आहे याची मला कल्पना आहे. माझा प्रशिक्षण सुविधा आणि सपोर्ट स्टाफवर विश्वास आहे. आम्ही आगामी हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू, असा विश्वास प्रशिक्षक गुलामरझा मझानदारानी यांनी व्यक्त केला.
यू मुंबाने लिलावादरम्यान सुनील कुमारला 1.15 कोटींमध्ये करारबद्ध केले असून तो प्रो कबड्डी लीगचा 11 मध्ये सर्वाधिक बोली लागणारा बचावपटू ठरला.