टी-20 मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची दणक्यात सुरुवात करताना विजयी सलामी दिली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने एका एकदिवसीय सामन्यात फलंदाजीत 50 पेक्षा जास्त धावा, गोलंदाजीत तीन विकेट आणि क्षेत्ररक्षणात चारपेक्षा अधिक झेल जास्त टिपणारा लाबुशेन हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने सलामीवीर बेन डकेट (95), विल जॅक (62) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने धावफलकावर 315 धावा लावल्या. कर्णधार हॅरी ब्रूक (39) आणि जेकब बेथेल (35) यांनीही उत्तम साथ दिली. अॅडम झम्पा आणि मार्नस लाबुशनने प्रत्येकी 3 विकेट बाद केले. ट्रव्हिस हेडनेही दोन विकेट घेतले. 316 धावांचा पाठलाग करताना ट्रव्हिस हेडने विजय खेचून आणला. हेडने 129 चेंडूंत 20 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 154 धावा ठोकल्या. लाबुशेनने 77 धावा करून ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला.
लाबुशेनचा अनोखा पराक्रम
इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान लाबुशेनने 6 षटकांत 39 धावा देत 3 बळी घेतले. सलामीवीर बेन डकेट, हॅरी ब्रूक आणि जोफ्रा आर्चरचे बळी घेतले. सामन्यादरम्यान लाबुशेनने डकेट, ब्रूक, जेकब बेथेल आणि आदिल रशीद यांचे झेल टिपले. नंतर फलंदाजी करताना लाबुशेनने 61 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. एका सामन्यात असा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.