दुलीप ट्रॉफीच्या अखेरच्या लढतीत ज्यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती ते सारेच अपयशी ठरले. हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी इशान किशन, मुशीर खान, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादवसारख्या फलंदाजांना संधी होती. पण सर्वच लवकर बाद झाले आणि त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे.
दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात हिंदुस्थान ‘अ’ संघाने संजू सॅमसनच्या 106 धावांच्या खेळीमुळे 349 अशी दमदार मजल मारली होती तर कर्णधार अभिमन्यू ईश्वरनच्या 116 धावांच्या खेळीने हिंदुस्थान ‘ब’ ला एकहाती सावरले. त्याला आघाडीच्या कुणाचीही साथ लाभली नाही. त्यामुळे त्यांची 5 बाद 100 अशी अवस्था होती, मात्र त्यानंतर अभिमन्यूने संघाला चक्रव्यूहातून बाहेर काढताना वॉशिंग्टन सुंदरसह 105 धावांची भागी रचली. या भागीमुळेच हिंदुस्थान ‘ब’ चा डाव सावरू शकला.
दिवसाचा खेळ संपायला अवघी दोन षटके शिल्लक असताना अभिमन्यूची खेळी 116 धावांवर संपली. या डावात मुशीर खान आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही अवघ्या पाच धावांवर बाद झाले. या दोघांनाही हिंदुस्थानी कसोटी संघात खेळायचे आहे, पण आज त्यांनी घोर निराशा केली. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी हिंदुस्थान ‘ब’ संघाला अजून 140 धावांची गरज आहे आणि त्यांचे 4 फलंदाज शिल्लक आहेत. ‘ड’ संघ आधीच स्पर्धेबाहेर गेला असल्यामुळे त्यांची आघाडी ‘ब’ संघाचे जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त करू शकतो.
आघाडीसाठी कांटे की टक्कर
दुलीप ट्रॉफीच्या जेतेपदाच्या शर्यतीत हिंदुस्थान ‘अ’ आणि ‘क’ हे संघ आघाडीवर आहेत. गुरुवारी शाश्वत रावतच्या शतकाने हिंदुस्थान ‘अ’ संघाला एकहाती सावरले होते आणि आज तशीच खेळी अभिषेक पोरेलच्या बॅटमधून निघाली, मात्र इशान किशन आणि रजत पाटीदारने घोर निराशा केली.
इशानने गेल्या सामन्यात शतक ठोकत निवड समितीचे लक्ष वेधले होते, पण आज तो 5 धावांवरच त्रिफळाचीत झाला. रजत तर भोपळासुद्धा फोडू शकला नाही. दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 216 या स्थितीत असलेला हिंदुस्थान ‘क’ 298 धावा गाठण्यात अपयशी ठरल्यास ते दुलीप ट्रॉफीपासूनही दूर जातील. त्यामुळे जो संघ आघाडी घेईल तोच जेतेपदाच्या समीप असेल.