पाकिस्तानला त्यांच्या गुहेत घुसून हरवणारा बांगलादेश क्रिकेट संघ हिंदुस्थानी मैदानात दुसऱ्याच दिवशी ढुस्स झाला. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या अफलातून फलंदाजीमुळे उभारलेली 376 धावांची मजल बांगलादेशसाठी डोंगराएवढी ठरली. जसप्रीत बुमरा, आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा यांच्या माऱ्यापुढे बांगलादेशची फलंदाजी 149 धावांतच धारातीर्थी पडली. त्यामुळे हिंदुस्थानने 227 धावांची जबरदस्त आघाडी घेत दुसऱ्या डावात 3 बाद 81 अशी मजल मारली आणि आपल्या आघाडीला 308 धावांवर नेले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुबमन गिल 33 तर ऋषभ पंत 12 धावांवर खेळत होते.
दिवसभरात 17 विकेट कोसळले
पहिल्या दिवशी केवळ 6 विकेट पडल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशी पहिल्या तासाभराच्या खेळात हिंदुस्थानने आपले चार फलंदाज 37 धावांत गमावले आणि मग बांगलादेशचे दहा फलंदाज बुमरा-आकाशदीप-जाडेजाने 149 धावांतच गुंडाळले. पुढे हिंदुस्थानचेही तीन विकेट बांगलादेशी गोलंदाजांनी 81 धावांत गुंडाळले. म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांनी 267 धावांत आपले 17 फलंदाज गमावले. बांगलादेशचा संघ 149 धावांत गडगडला असला तरी हिंदुस्थानचे 7 फलंदाज 118 धावांत गारद झालेत.
जाडेजाचे पाचवे शतक हुकले
गुरुवारी पहिल्या दिवशी रवींद्र जाडेजा ज्या पद्धतीने खेळला होता तोसुद्धा आपले पाचवे शतक साकारणार हीच साऱ्यांची अपेक्षा होती, पण तो आपल्या धावसंख्येत एकाही धावेची भर घालू शकला नाही. तो 86 धावांवरच बाद झाला आणि त्याच्या शतकाची संधी हुकली. त्यांचे सातव्या विकेटसाठी द्विशतकी भागीचा विक्रमही पूर्ण होऊ शकला नाही.
तस्किन अहमदने लिटन दासकरवी त्याला बाद केल्यामुळे ही भागी 199 धावांवर फुटली. त्यानंतर अश्विनने काही काळ किल्ला लढवला. आकाश दीपने चार चौकार खेचत डावात जोश भरला. पण तो बाद झाल्यावर अश्विनचीही विक्रमी खेळी 113 धावांवर थांबली आणि पुढे हसन मेहमूदने बुमराला बाद करत डावात पाच विकेट टिपण्याची कामगिरी केली.
बांगलादेशने निराश केले
बांगलादेशच्या गोलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दोन सत्रांवर वर्चस्व गाजवत जोरदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर अश्विन आणि जाडेजाने अप्रतिम खेळ करीत त्यांच्या कामगिरीला पायदळी तुडवले. हिंदुस्थानचा डाव संपल्यानंतर बांगलादेशी फलंदाजांकडून खेळाची अपेक्षा होती, पण हिंदुस्थानी माऱ्यापुढे त्यांनी नांगी टाकली. जसप्रीत बुमराने आपल्या नेहमीच्याच शैलीत हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले.
सलामीवीर शादमन इस्लामचा त्रिफळा उडवत सनसनाटी सुरुवात केली. त्यानंतर आकाश दीपने झाकीर हसन आणि मोमीनुल हक यांचे सलग चेंडूवर त्रिफळे उद्ध्वस्त केले. आकाशला हॅटट्रिकचीही संधी होती, पण मुशफिकर रहीमने ती उधळून लावली. मात्र मुशफिकर रहीम आणि लिटन दास यांचीही विकेट पडल्यामुळे बांगलादेशची 5 बाद 40 अशी दुर्दशा झाली होती.
या अवस्थेनंतर शाकिब अल हसन आणि लिटन दास यांनी 51 धावांची भागी रचत संघाची पडझड रोखली. पण हे दोघेही अवघ्या एका धावेच्या अंतरात बाद झाले आणि या दोघांना बाद करण्याची किमया रवींद्र जाडेजाच्या फिरकीने केली. त्यामुळे बांगलादेशची 7 बाद 92 अशी अवस्था झाली. त्यानंतर मेहिदी हसन (27) आणि तळाच्या तस्किन अहमद आणि नाहिद राणा यांनी फटकेबाजी करत संघाला कसेबसे 149 पर्यंत नेले.
एकाही बांगलादेशी फलंदाजाला हिंदुस्थानी आक्रमणाचा संयमाने सामना करता आला नाही. फलंदाजांच्या अपयशामुळे हिंदुस्थानने दिवसावरच नाही तर कसोटी सामन्यावरच आपली पकड मजबूत केली. आता बांगलादेशला पराभवापासून केवळ चमत्कारच वाचवू शकतो.
बुमराचे 400 आंतरराष्ट्रीय विकेट
जसप्रीत बुमराने शादमन इस्लामची यष्टी वाकवत आपला 398 वा आंतरराष्ट्रीय विकेट घेतला आणि पुढे त्यात आणखी दोघांची भर घालत आपल्या विकेटचा आकडा 400 वर नेला. त्याने आतापर्यंत कसोटीत 163, वन डेत 149 आणि टी-20 त 89 विकेट घेतल्या आहेत. हिंदुस्थानकडून आतापर्यंत नऊ गोलंदाजांनी ही कामगिरी केली असून बुमरा दहावा आहे. सर्वाधिक 953 विकेट अनिल कुंबळेने टिपले आहेत आणि सध्या खेळत असलेला अश्विन (744), रवींद्र जाडेजा (570) आणि मोहम्मद शमी (448) हे तिघेच 400 पेक्षा अधिक विकेट टिपत बुमराच्या पुढे आहेत.
आणि रोहित हळहळला…
आज विराट कोहलीने चांगली सुरुवात केली होती. त्याच्या दोन चौकारांनी प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पहिल्या डावात तो 6 धावांवर बाद झाल्यामुळे त्याच्या फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण मेहदी हसन मिराजच्या एका चेंडूने त्याचा घात केला. तो चेंडू विराटच्या पॅडवर आदळला आणि पंचांनी त्याला बाद दिले.
विराटला डीआरएस घेण्याची संधी होती, पण त्याने तो घेतला नाही आणि निराश होत पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. तेव्हाच स्टेडियमच्या स्क्रीनवर दिसले की चेंडू पॅडच्या आधी बॅटला चाटून गेला होता. म्हणजेच विराट बाद नव्हता. हे पाहून कर्णधार रोहित शर्माने डोक्याला हात लावला आणि निराशाही व्यक्त केली. डीआरएस असूनही विराटने तो न मागितल्यामुळे प्रेक्षकही निराश झाले.