ग्लेन फिलीप्सच्या 49 धावांच्या घणाघाती खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 35 धावांची माफक धावांची आघाडी घेतली. त्यानंतर श्रीलंकेने दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंडीमल यांच्या 147 धावांच्या भागीच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 237 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. कसोटीचे अजून दोन दिवस शिल्लक असून मालिकेत आघाडी घेण्याची दोन्ही संघांना समान संधी आहे.
गुरुवारी 4 बाद 255 या दमदार स्थितीत असलेल्या न्यूझीलंडला प्रभात जयसूर्याने एकामागोमाग तीन धक्के दिल्यामुळे त्यांची 9 बाद 304 अशी धक्कादायक अवस्था झाली होती. पण तेव्हा ग्लेन फिलीप्स श्रीलंकन गोलंदाजीवर तुटून पडला आणि त्याने 5 षटकार आणि 2 चौकारांचा वर्षाव करत नाबाद 49 धावा ठोकल्या.
रमेश मेंडिसने विलियम ओरूरकेचा त्रिफळा उडवत पाहुण्यांचा डाव 340 धावांवर संपवला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने खराब सुरुवातीनंतर करुणारत्ने (83) आणि दिनेश चंडीमल (61) यांनी दमदार खेळी केल्या. मग अँजेलो मॅथ्यूज आणि कर्णधार धनंजया डि’सिल्व्हा यांनी 61 धावांची अभेद्य भागी रचत संघाची मजल 237 पर्यंत नेली.