वेब न्यूज – उड्डाण शुक्रयानाचे

गेल्या वर्षी इंडियन नॅशनल सायन्स अकादमीच्या एका सत्रात बोलताना हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी शुक्राच्या संदर्भात (व्हीनस)  एक महत्त्वाचे विधान केले होते. शुक्रावरचे वातावरण आणि त्याचे आम्लीय वर्तन समजून घेण्यासाठी शुक्रावर एक मोहीम आखणे गरजेचे असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. डॉ. एस. सोमनाथ यांचे हे विचार आता प्रत्यक्षात उतरणार असून केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच शुक्रयान अर्थात व्हीनस ऑर्बिटर मिशनला (VOM) मान्यता दिली आहे. या मोहिमेसाठी सरकारने 1236 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या निधीपैकी 824 कोटी शुक्र मोहिमेसाठी तयार केल्या जाणाऱ्या विशेष यानावर खर्च होणार आहेत.

या मोहिमेसाठी अंतराळयान बनवण्याची आणि त्याचे प्रक्षेपण करण्याची संपूर्ण जबाबदारी इस्रोची असणार आहे. मार्च 2028 मध्ये शुक्र पृथ्वीच्या जवळ असणार आहे. त्यामुळे या कालावधीत इस्रो ही मोहीम राबवण्याची दाट शक्यता आहे. या मोहिमेत शुक्राच्या वातावरणातील दाबाचा खास अभ्यास केला जाणार आहे. शुक्राचा वायुमंडलीय दाब हा पृथ्वीपेक्षा शंभरपट जास्त आहे. मोहिमेसाठी बनवलेले यान शुक्राला प्रदक्षिणा घालत त्याचा अभ्यास करणार आहे. चार वर्षांचा कालावधी असलेल्या या मोहिमेत शुक्रयान अवकाशातून शुक्राची भौगोलिक रचना आणि ज्वालामुखीच्या हालचालींचा अभ्यास करेल. तसेच ग्रहावरील भूगर्भातील वायूंचे उत्सर्जन, वाऱ्याचा वेग, ढग आणि इतर गोष्टींचा अभ्यास करेल.

पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला हा ग्रह सूर्यमालेतील पहिला असा ग्रह मानला जातो, ज्यावर जीवन होते असा अंदाज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकेकाळी हा ग्रह पूर्णपणे पृथ्वीसारखा होता. त्याचा आकारदेखील पृथ्वीसारखा होता. या ग्रहावर एक महासागर होता आणि तेथील हवामानदेखील पृथ्वीसारखे होते. मात्र आता हा ग्रह आणि त्याचे वातावरण पूर्ण बदलले आहे. काचेलादेखील विरघळवणारे 475 अंशांचे उष्ण तापमान आणि वातावरणात पसरलेले कार्बन डायऑक्साईडसारखे अत्यंत विषारी वायू आणि सल्फ्युरिक ऑसिडच्या पिवळ्या ढगांनी त्याला वेढून टाकले आहे.

स्पायडरमॅन