रस्त्यावरून चालत असताना अडखळून पडल्याने डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवलीत घडली. याप्रकरणी डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. बोरिवली पूर्वेकडील कार्टर रोड क्रमांक 3 येथे दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली.
मयत मुलगा शाळेच्या गणवेशात रस्त्यावरून चालला होता. यावेळी रस्त्यावरील दुभाजकाला धडकून तो खाली पडला. दुर्दैवाने बाजूने चाललेल्या डंपरच्या मागच्या चाकाखाली तो आला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर डंपर चालक पळून गेला. मग स्वतःहून त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. मुलाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.