हरियाणातील कालका मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रदीप चौधरी यांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. रायपूर राणीच्या भरौली गावात हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चौधरी यांच्या ताफ्यातील एक जण जखमी झाला आहे. गोल्डी खेडी असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्याला उपचारासाठी पीजीआयमध्ये रेफर करण्यात आले.
प्रदीप चौधरी हे कालका मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून पक्षाने त्यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात चौधरी यांच्याविरोधात भाजपने शक्ती राणी शर्मा यांना तिकीट दिले आहे.
चौधरी यांच्या ताफ्यातील वाहनावर तीन राऊंड गोळीबार झाल्याचे कळते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोटारसायकलवरून आले होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौधरी जनसंपर्क साधत आहेत. चौधरी रायपूर राणी परिसरात क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी आले होते. यावेळी गोळीबाराची घटना घडली.