लहान मुलांवरुन दोन कुटुंबात झालेल्या वादातून हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत पसरवल्याची घटना राहुरीत घडली. घटनास्थळी व्यापारी संघटनचे अध्यक्ष सतीश वाळूंज यांच्यासह काही जागृत नागरीक आणि राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी धाव घेऊन वाद मिटवला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील विश्वकर्मा चौकात गुरुवारी रात्री दोन कुटुंबात लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद झाला. यातील एका कुटुंबाने श्रीरामपूर येथील 100 ते 200 लोकांना बोलावून घेतले. या जमावाने हातात घातक शस्त्र व काठ्या घेत शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारहाण करत नंग्या तलवारी फिरवल्या.
या दहशतीनंतर देवळालीतील सर्व पक्षीय नागरिकांनी राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन दिले. संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा राहुरी पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.