चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारमुळे भीषण अपघात, रायडरचा जागीच मृत्यू; भाजपशी संबंधित असलेला आरोपी मोकाट

पुण्यातील पोर्शे कार अपघात, मुंबईतील वरळीमधील हीट अँड रन प्रकरणात आरोपींच्या बाजूनेच पोलीस असल्याचा आरोप झाला. आता गुरुग्राममध्येही अशी एक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय बाईक रायडरला कार चालकाच्या चुकीमुळे जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार चालक हा सत्ताधारी भाजपशी संबंधीत असून त्याला तत्काळ जामीन देण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

‘माझा 21-22 वर्षांचा तरुण मुलगा आम्हाला सोडून गेला. म्हातारपणी तो आमचा आधार बनणार होता. मात्र आता आम्ही कुठे जाणार. ज्याने माझ्या मुलाचा जीव घेतला, त्याला पोलिसांनी जामीन मंजूर केला. हा कसला कायदा आहे. आज माझ्या मुलासोबत घडलं, उद्या इतर कोणाचा जीव घेईल,’ अशी संतप्त भावना मृत अक्षत गर्ग याच्या आईने व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. दरम्यान, 15 सप्टेंबरला हरयाणातील गुरुग्रामध्ये भरधाव दुचाकी आणि महिंद्रा XUV यांच्यामध्ये जोरदार धडक झाली होती. चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारमुळे हा भयानक अपघात झाला. या दुर्घटनेत बाईक रायडर अक्षत गर्ग याचा मृत्यू झाला होता. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना अक्षतचा मित्र प्रध्युमनच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. धक्कदायक बाब म्हणजे पोलिसांनी हे फुटेज घेतले नाही. घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी प्रध्युमनकडे फुटेजची मागणी केली. मात्र आरोपी कुलदीप ठाकूरला यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता. विशेष म्हणजे रविवार आणि सोमावर सुट्टी असून सुद्धा आरोपीला तत्काळ जामीन देण्यात आला. त्यामुळे पोलिसांची तत्परता पाहून त्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.