छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील सराईत जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या जाफराबाद पोलिसांनी 19 सप्टेंबर रोजी मुसक्या आवळल्या असून, या आरोपीने जाफराबाद तालुक्यातील कुंभारी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील तीन आरोपी मात्र फरार झाले आहेत. या आरोपीवर छत्रपती संभाजीनगर, कन्नड, वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
कुंभारी गावात 19 सप्टेंबर रोजी रात्री घरफोडीचे प्रकार झाल्याने या घरफोडी गुन्हातील आरोपींचा शोध घेण्यासाठी जाफराबाद पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली होती. माहोरा बिट पथकामध्ये असलेल्या पथकातील पोकॉ. विजय जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली.
आरदखेडा फाटा या ठिकाणी चारजण दोन मोटारसायकलवर थांबलेले असुन ते घरफोडी करणारे चोर आहे. अशा माहितीवरून पोकों विजय जाधव यांनी स्थानिक नागरिकांना मदतीला घेऊन तात्काळ आरदखेडा फाटा या ठिकाणी संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
यादरम्यान पोलिसांना संशय आल्याने दोन चोरटे दोन मोटारसायकलवर आरदखेडा गावाकडे पळाले व त्यातील दोन जण मक्काच्या शेतात पळाले. पोकॉ. विजय जाधव यांना मकाच्या शेतात पळालेल्या एकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला कळवून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, पोलीस उपनिरीक्षक नेमाणे, सफौ. दांडगे, पोहेकॉ. जायभाये, पोहेकॉ. भुतेकर, पोकों लक्कस, पोकों भागिले, पोकों म्हस्के, मोरे हे तात्काळ घटनास्थळी आले. यावेळी संशयितांस नावे विचारले असता अतिश अशोक पवार (रा. नवपूरवाडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता घरफोडी चोरी करण्याचे साहित्य मिळून आले.
हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरोधात वाळूज पोलीस ठाणे दोन जबरी चोरीचे गुन्हे, पोलीस ठाणे हसूल, संभाजीनगर शहर येथे एक जीवघेणे हल्ला, कन्नड पोलीस ठाण्यात एक गुन्हा अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे. हा आरोपी व त्याच्या इतर साथीदारांनी कुंभारी येथील घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. या आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 313 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून घरफोडीच्या गुन्हात अटक करण्यात येणार आहे.
हा कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधीक्षक गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक पठाडे, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोहेकॉ. प्रभाकर डोईफोडे, पोहेकॉ. महेश वैद्य, पोहेकॉ. गावंडे, पोना पठाडे, पोना टेकाळे, पोकों डुरे, डोईफोडे, शॉन पथकाचे हँडलर पोहेकों मिसाळ, पोकों पल्लेवाड, फिंगर पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कठाळे, पोहेकॉ वाघ हे पुढील तपास करीत आहेत.