गांजाविक्रीचे पैसे थेट बँक खात्यावर घेण्यासाठी गांजातस्कराने क्यूआर कोड स्कॅनर जवळ बाळगल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. या गांजातस्कराला सांगवी पोलिसांनी जेरबंद केले असून, त्याच्याकडून 3 किलो 220 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि. 15) पिंपळे निलख येथे करण्यात आली.
बसिस्ट जरभान साहू (वय 38, रा. विशालनगर, पिंपळे निलख, मूळ – कुंदाबुटला, चुलीफुनका, जि. बालांगीर, ओडिशा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस विशालनगर पिंपळे निलख येथे गस्त घालत असताना, पोलिसांना पाहून एक व्यक्ती पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे 3 किलो 220 ग्रॅम गांजा मिळून आला. तसेच, एक मोबाईल फोन आणि बँकेचा स्कॅनरदेखील आढळून आला. पोलिसांनी 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. साहू गांजाविक्रीतून येणारी रक्कम तो डिजिटल स्वरूपात थेट बँकेच्या खात्यात घेत असे. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.
“साहू हा गांजाविक्री केल्यानंतर त्याचे पैसे ओडिशा येथील एका बँकेच्या क्यूआर कोड स्कॅनरद्वारे आपल्या खात्यावर घेत असे. संबंधित बँकेला पोलिसांनी ई-मेल केला असून, क्यूआर कोड स्कॅनरद्वारे केलेल्या व्यवहारांची माहिती मागविली आहे.
महादेव भालेराव, फौजदार – सांगवी.