एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. याबाबतचा एफआयआर मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे याने समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला. तशी तक्रारदेखील पोलीस ठाण्यात केली असून पुरावेसुद्धा दिले. मात्र 24 तास उलटले तरी अद्याप मुजोर वामन म्हात्रेवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे बदलापूर पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मिंधे सरकारच्या काळात पीडित कुटुंबाला न्याय मिळणार की नाही, मुलीचे नाव उघड करणाऱ्या म्हात्रेवर केव्हा कारवाई होणार, असा सवाल बदलापूरकरांनी केला आहे.
शाळेतील सफाई कामगारानेच दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यातील आरोपी अक्षय शिंदे हा सध्या तुरुंगात असून संबंधित शाळेचे अध्यक्ष व सचिव यांनाही पोक्सो लावण्यात आला आहे. ते दोघे कुठे राहतात, काय करतात याची माहिती पोलिसांना असूनही त्यांना पकडण्यास अपयश आले आहे. एकीकडे अध्यक्ष व सचिव फरार झाले असतानाच दुसरीकडे मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे याने न्यायालयाचे आदेश व सर्व संकेत पायदळी तुडवून ‘त्या’ घटनेची एफआयआर कॉपीच व्हायरल केली.
पीडितेचे व कुटुंबाचे नाव उघड केल्याने आणखी आमची बदनामी झाली असल्याचे मुलीच्या आईने म्हटले आहे. तिने तातडीने पोलीस ठाणे गाठून आमची व मुलीची बदनामी करणाऱ्या वामन म्हात्रेवर त्वरित पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी केली. त्याबाबतचे सर्व पुरावेदेखील पोलिसांना सादर केले, पण चोवीस तास उलटून गेले तरी म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.