Apple iPhone 16 series – आयफोन हिंदुस्थानात आला रे! खरेदीसाठी मुंबई, दिल्लीमध्ये अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान गर्दी

गेल्या आठवड्यामध्ये अ‍ॅपल कंपनीने आयफोन-16 सीरिज लॉन्च केली होती. हा फोन आता हिंदुस्थानमध्येही आला असून आजपासून याची विक्री सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी मुंबई, दिल्लीमध्ये आयफोन खरेदीसाठी अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान गर्दी झाली असून रांगा लागल्या आहेत.

मुंबईतील बीकेसी भागामध्ये अ‍ॅपलचे स्टोअर आहे. हिंदुस्थानमधील हे पहिले स्टोअर असून येथे शुक्रवार सकाळपासून आयफोन-16 खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रांग लावली आहे. राज्यातील विविध भागांमधून आयफोनप्रेमी मुंबईत दाखल झाले आहेत.

दुसरीकडे दिल्लीतही अशीच परिस्थिती आहे. दिल्लीतील साकेत भागातील सिलेक्ट सिटीवॉकमधील अ‍ॅपल स्टोअरबाहेर रांग लावून उभे आहेत. विशेष म्हणजे काही नागरिक पररराज्यातूनही आयफोन खरेदीसाठी मुंबई आणि दिल्लीत पोहोचले आहेत. काही नागरिकांनी तर गुरुवारी रात्रीपासून अ‍ॅपल स्टोअरबाहेर शड्डू ठोकलेला आहे.

अ‍ॅपल कंपनीने 9 सप्टेंबरला इट्स ग्लोटाइम या इव्हेंटमध्ये आपली नवीन आयफोन 16 सीरिज लाँच केली होती. कंपनीने शुक्रवारपासून आयफोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात केली आहे. कंपनीने 16 सीरिजअंतर्गत आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स हे चार फोन लॉन्च केले होते. तसेच कंपनीने या सीरिजशिवाय अ‍ॅपल वॉच सीरिज 10 आणि एअरपॉड्स 4 सुद्धा लाँच केले होते. आयफोन 16 सीरिजचे फोन हिंदुस्थानशिवाय जवळपास 50 देशांत प्री ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

  • आयफोन 16 – 79,900 रुपये (128 जीबी) 89,900 रुपये (256 जीबी), 1,09,900 (512 जीबी)
  • आयफोन 16 प्लस – 89,900 रुपये (128 जीबी), 99,900 रुपये (256 जीबी), 1,11,900 रुपये (512 जीबी)
  • आयफोन 16 प्रो – 1,19,900 रुपये (128 जीबी), 1,44,900 रुपये (256 जीबी), 1,64,900 रुपये (512 जीबी), 1,84,900 रुपये (1 टीबी)
  • आयफोन 16 प्रो मॅक्स – 1,29,900 रुपये (256 जीबी), 1,49,900 रुपये (512 जीबी), 1,69,900 रुपये (1 टीबी)